सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क…
सांगोला तालुक्याचे विश्वविक्रमवीर माजी आमदार कै.भाई गणपतरावजी देशमुख यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तसेच त्यांचे विचार आत्मसात करून दुष्काळग्रस्तांसाठी लढण्याचा त्यांचा संघर्षमय आदर्श डोळ्यासमोर ठेवून मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील दुष्काळी गावांचा समावेश असलेल्या भोसे जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविणार असल्याचे प्रतिपादन ॲड. नामदेव मेटकरी यांनी व्यक्त केली आहे.

आरोग्य, वीज, पाणी, रस्ते, शिक्षण या पायाभूत सुविधांना प्राधान्य…
यावेळी बोलताना ॲड.नामदेव मेटकरी म्हणाले, भोसे जिल्हा परिषद गटातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य, वीज, पाणी, रस्ते आणि विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे शिक्षण या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा माझा प्राथमिक अजेंडा असेल आणि त्यासाठी वाटेल तो संघर्ष करण्याची तयारी आहे. प्रतिकूल परिस्थितीतून वकिली व्यवसायाचे शिक्षण घेऊन गेल्या १८ वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालय आणि पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करत असल्याने अनेक गरजूंना न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे, न्यायालयीन लढा कसा लढायचा हे मला अवगत आहे. तसेच रस्त्यावरची लढाई कशी लढायची हे सुद्धा मला माहित आहे.

मित्रमंडळी, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण कार्यकर्त्यांकडून आग्रह..
ते पुढे म्हणाले, सर्वसामान्यांचा सर्वांगीण विकास, तरुणांना प्रशिक्षित करून वेगवेगळ्या रोजगार व नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण व सक्षमीकरण हे माझे प्रमुख विषय असतील. न्यायालयीन कामकाज व सामाजिक चळवळच्या माध्यमातून मंगळवेढा दक्षिण भागातील परिसरामध्ये माझा दांडगा जनसंपर्क आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून नंदेश्वर व परिसरातील अनेक मित्रमंडळी, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण कार्यकर्त्यांकडून त्यांना भोसे जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी असे आवाहन केले जात आहे. या सर्वांच्या विश्वासास पात्र ठरत, कोणत्याही परिस्थितीत या गटातून मी निवडणूक लढविणार आणि जिंकणार आहे, असे ठाम प्रतिपादन ॲड.नामदेव मेटकरी यांनी केले आहे.























