(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी आणि शिरशी या दोन्ही गावांच्या हद्दीवर हॅटसन अॅग्रो प्रॉडक्ट्स लि. या कंपनीचे उत्पादन युनिट कार्यरत आहे. कंपनीतून बाहेर सोडले जाणारे सांडपाणी आजूबाजूच्या परिसरात पाझर होत असल्यामुळे गोणेवाडी व परिसरातील पाण्याचे प्रदूषण होत आहे. या जलप्रदूषणामुळे गोणेवाडी गावातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपात जाणवू लागला आहे. अनेक ठिकाणी पाण्याची चव, रंग व वास बदललेला जाणवतो, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत व अजून समस्या निर्माण होऊ शकतील.

हॅटसन कंपनीने सामाजिक बांधिलकी जपावी…
तरी कंपनीकडून सीएसआर (CSR) अंतर्गत सामाजिक बांधिलकी जपत, आमच्या गोणेवाडी गावात शुद्ध पाण्यासाठी वॉटर फिल्टर यंत्र बसविण्यात यावे, अशी मागणी गोणेवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. या मागणीचे निवेदन हॅटसन अॅग्रो प्रॉडक्ट्स लि., व्यवस्थापकांना देण्यात आले आहे.बापू मासाळ, दीपक मासाळ, नवनाथ मासाळ, श्रीराम मासाळ यांनी दिले.

आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल….
हॅटसन अॅग्रो प्रॉडक्ट्स लि. या मोठ्या कंपनीमुळे मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील काही तरुणांच्या हाताला काम मिळाले आहे व तसेच उद्योग वाढले पाहिजे तरच देशाचा विकास होईल. हे जितके सत्य आहे तितकेच ज्या भागात ही कंपनी उभी आहे त्या भागातील आसपासच्या सर्वसामान्य लोकांच्या आरोग्यास धोका होऊ नये ही जबाबदारी उद्योग चालकांनी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे गोणेवाडी ग्रामस्थांच्या या मागणीची दखल घेऊन हॅटसन कंपनीने वेळेत पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग निवडावा लागेल. असा इशारा पै. बापू मासाळ आणि पै. दीपक मासाळ यांनी दिला आहे.
























