मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी
बसव भारती अनुभव मंटप समिती महाराष्ट्र यांच्या वतीने सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. बापूसाहेब मेटकरी यांना बसव प्रबोधनकार या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सन्मानामुळे सामाजिक, शैक्षणिक व बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, ॲड. मेटकरी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

ॲड. बापूसाहेब मेटकरी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील वंचित, उपेक्षित आणि बहुजन घटकांसाठी सातत्याने कार्य केले आहे. सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांच्या प्रसारासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय कार्य केले आहे. बसवेश्वर महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करत समाजात प्रबोधन घडवून आणण्याचे कार्य त्यांनी प्रभावीपणे केल्यामुळेच त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
पुरस्कार स्वीकारताना ॲड. मेटकरी यांनी हा सन्मान समाजासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव असल्याचे नमूद केले. बसवेश्वर महाराजांचे विचार आजच्या समाजाला अधिक गरजेचे आहेत. समतेवर आधारित समाजनिर्मितीसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. या पुरस्कारानंतर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून ॲड. बापूसाहेब मेटकरी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी अनेकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या असून, हा सन्मान बहुजन चळवळीला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

मंगळवेढा तालुका ही जगत ज्योती महात्मा बसवन्नांची कर्मभूमी आहे. या पावन भूमीत महात्मा बसवन्नांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य-दिव्य स्मारक लवकरात लवकर उभे राहावे, या उद्देशाने मंगळवेढा ते सोलापूर शिवयोग पदयात्रेची सुरुवात करण्यात आली आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वर ते शिदरामेश्वरांच्या पावन नगरीत विचारांचे प्रबोधन होईल आणि येणाऱ्या पिढीला समतेचा संदेश मिळेल. ही शिवयोग पदयात्रा कायमस्वरूपी सुरू राहणार आहे.
ॲड. बापूसाहेब मेटकरी























