(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथे श्री बाळकृष्ण माऊली अध्यात्म ज्ञान मंदिरात श्री बाळकृष्ण माऊलींच्या पुण्यतिथी सप्ताह सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री माऊली सेवा मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. दि. शनिवार दिनांक २७ सप्टेंबर ते बुधवार दि. १ ऑक्टोंबर या पाच दिवसांच्या काळात पुण्यतिथी सप्ताह सोहळा संपन्न होणार आहे. शनिवार दि. २७ रोजी पहाटे पाच ते सहा या वेळेत प्रभात फेरी होऊन पुण्यतिथी सप्ताह सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. मठाधिपती बाळासाहेब महाराज यांचे हस्ते विनापूजन तसेच ग्रंथराज श्री दासबोध व श्री बाळकृष्ण चरित्रामृत ग्रंथाचे पुजन होईल.
सोमवार दि. २९ रोजी पहाटे पाच वाजता नंदेश्वर येथील भाविक भक्त श्रीक्षेत्र इंचगिरी येथे नामज्योत आणण्यासाठी रवाना होतील. इंचगिरी येथे नामज्योत आणण्यासाठी गेलेले भाविक मंगळवारी दुपारी ठीक चार वाजता श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे येथील व यानंतर श्री बाळकृष्ण माऊलींच्या पालखीची भव्य अशी मिरवणूक निघेल. बुधवार दि. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक नऊ वाजता संगीत भजनात प्रारंभ होईल. यानंतर सकाळी ठीक अकरा वाजता मठाधीपती बाळासाहेब महाराज यांच्या सुश्राव्य अशा प्रवचनास सुरुवात होईल. यानंतर दुपारी ठीक बारा वाजता पुष्पवृष्टी होऊन महाप्रसादानंतर या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात येईल.
सप्ताह काळात विविध धार्मिक कार्यक्रम…
सप्ताह काळात पहाटे चार ते पाच या वेळेत काकड आरती, पाच ते सहा वाजता प्रभात फेरी, सकाळी सात ते आठ श्रींची महापुजा, आठ ते नऊ वा. श्री भागवत वाचन व ध्यान, सकाळी नऊ ते दहा वाजता संगीत भजन, दहा ते बारा वाजता प्रवचन व दुपारची आरती, दुपारी तीन ते सहा वाजता प्रवचने, परमार्थिक व्याख्याने व भजन, सायंकाळी सहा वाजता सायंकाळची आरती, रात्री सात ते आठ वा. श्री भागवत वाचन व ध्यान, रात्री आठ ते दहा वाजता संगीत भजन, रात्री दहा ते बारा वाजता कीर्तन, प्रवचन व बारा अभंग असे धार्मिक कार्यक्रम होतील.
महाराष्ट्रासह परराज्यातील भाविक-भक्त मोठ्या संख्येने होतात सहभागी..
पुण्यतिथी सप्ताह सोहळा काळात महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकार, कीर्तनकार, साधुसंत मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोकण यांसह गोवा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ इत्यादी परराज्यातूनही भाविक भक्त दरवर्षी बाळकृष्ण महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताह सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होतात. या सोहळ्यात सहभागी होणारा नोकरवर्ग विशेष करून सुट्टी घेऊन सहभागी होतात.
