सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क:
सध्या चोरी व लुटमारीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असून, विजयपूर जिल्ह्यातील चडचण शहरात मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. चडचण येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत अज्ञात पाच बंदूकधारी दरोडेखोरांनी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सुमारे आठ कोटी रुपयांची रोकड आणि ५० किलो सोने लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
कर्मचाऱ्यांना बंदीस्त करून तिजोरी साफ..
मिळालेल्या माहितीनुसार, बँकेतील नियमित कामकाज संपल्यावर काही कर्मचारी उर्वरित काम करत असताना, एका कारमधून आलेल्या पाच सशस्त्र दरोडेखोरांनी बँकेत घुसून सर्व कर्मचाऱ्यांना बंदुकीच्या धाकाने हातपाय बांधून एका खोलीत बंद केले. त्यानंतर तिजोरीची चावी मिळवून त्यांनी बँकेत असलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने लुटले. दरोडेखोर हे अत्यंत नियोजित पद्धतीने आणि जलद कारवाई करून पसार झाले.
पोलिस प्रशासन सतर्क, सीमाभागात अलर्ट…
दरोडेखोर हे महाराष्ट्राच्या दिशेने कारमधून निघाले असल्याचा पोलिसांना संशय असून, कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांना तत्काळ सतर्क केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवरील पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट..
घटनेची माहिती मिळताच विजयपूरचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निम्बर्गी, इंडी विभागाचे उपअधीक्षक आर. जगदीश आणि चडचणचे सीपीआय सुरेश बेंडेगुंबाळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती, आणि पोलीस अधिक तपास करत आहेत.
शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण…
ही घटना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, मुख्य रस्त्यावर असलेल्या बँकेत घडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, लवकरच आरोपींचा माग काढला जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपशीलांसाठी पोलिस तपास प्रगतीकडे लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना तत्काळ कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
