(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
कर्नाटकातील चडचण येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर 15 सप्टेंबर रोजी झालेल्या 21 कोटी रुपयांच्या सशस्त्र दरोड्याला आता मंगळवेढा तालुक्याचे नवे कनेक्शन मिळाले आहे. दरोड्यात वापरण्यात आलेली मारुती कार ही मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथून 8 सप्टेंबर रोजी चोरीला गेली होती, हे तपासात स्पष्ट झाले आहे.
हीच कार दरोड्यानंतर पळून जाताना हुलजंती येथे अपघातग्रस्त अवस्थेत पोलिसांच्या हाती लागली. कारमधून रोकड आणि सोन्याचे दागिने हस्तगत झाले असून, यानंतर दोन दिवसांत हुलजंती येथील एका जुन्या घराच्या पत्र्यावर एक संशयास्पद बॅग सापडली, ज्यामध्ये तब्बल साडेसहा किलो सोने आणि 41 लाख 4 हजार रुपयांची रोकड सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरोड्यात वापरलेली कार आणि तिचे मंगळवेढ्यातील कनेक्शन:
दरोड्यात वापरण्यात आलेली मारुती कार ही साताऱ्याच्या मालकाची असून, कोल्हापूरमधील एजंटमार्फत ती आंधळगाव येथे विकण्यात आली होती. मात्र विक्री केवळ कराराने झाली असल्याने, कागदपत्रांवर नाव बदल झाले नव्हते. 8 सप्टेंबर रोजी ही कार आंधळगाव येथून चोरीला गेली होती. पोलिसांनी या कारच्या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्यावरून चोरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हुलजंतीत मिळालेली कार आणि मुद्देमाल:
दरोड्यानंतर पळून जात असताना दरोडेखोरांची गाडी मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे एका दुचाकीला धडकली, आणि त्यामुळे ती पोलिसांच्या तावडीत आली. कारमध्ये एक सोन्याचे पाकीट, रोकड, हेल्मेट आणि मास्क मिळाले. यानंतर हुलजंती येथील जुन्या घराच्या पत्र्यावर सापडलेल्या बॅगेतून आणखी 136 सोन्याची पाकिटे, साडेसहा किलो सोने आणि 41 लाखांहून अधिक रोकड हस्तगत झाली.
राजकीय सूत्रधाराच्या चर्चेला उधाण:
या संपूर्ण तपासात आता राजकीय सूत्रधार असल्याची शक्यता वर्तवली जात असून, कर्नाटक, मंगळवेढा, सोलापूर आणि उमदी येथे पोलिसांची पथके काम करत आहेत. सुमारे नऊ संशयितांची चौकशी सुरू असून, मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांच्या आधारे या गुन्ह्याचा मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.
संपूर्ण प्रकरणावर एक नजर:
15 सप्टेंबर: चडचण येथील स्टेट बँक ऑफ इंडिया वर 21 कोटींचा दरोडा
8 सप्टेंबर: मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथून कार चोरी
दरोड्यानंतर: हीच कार हुलजंती येथे अपघातग्रस्त अवस्थेत सापडली
कार व बॅगेतून: साधारण 7 किलो सोने व 44 लाख रुपये हस्तगत
नवीन अँगल: मंगळवेढा आणि हुलजंती यांचा थेट संबंध
(स्त्रोत एबीपी मराठी)
