(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
बाईचा नाद करू नको असा सल्ला दिल्याने एका पुतण्याने रागाच्या भरात काकावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या घटनेत त्यांना वाचवण्यासाठी धावून आलेल्या काकूलाही पुतण्याने चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
झालं नेमकं काय?
महाद्वार चौकात कुंकवाचं दुकान चालवणारे ज्ञानेश्वर सूर्यवंशी (वय अंदाजे ५०) यांनी आपल्या पुतण्याला – प्रशांत पांडुरंग सूर्यवंशी – याला ‘बाईचा नाद सोड’ आणि ‘घरात नीट वाग’ असा सल्ला दिला होता. यावरून आधीपासूनच घरात तणावाचं वातावरण होतं. मंगळवारी झालेल्या वादानंतर बुधवारी (२४ सप्टेंबर) रात्री साडेअकरा वाजता झोपेत असलेल्या ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्यावर प्रशांतने थेट गळ्यावर चाकूने वार केला.
त्यांच्या किंकाळ्या ऐकून धावून आलेल्या पत्नी अनिता सूर्यवंशी यांच्यावरही प्रशांतने चाकूने हल्ला केला. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांची प्रकृती चिंताजनक असून ते अद्याप बेशुद्ध आहेत.
पोलिसांकडून गुन्हा दाखल..
या प्रकरणी आरोपी प्रशांत सूर्यवंशीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या हल्ल्यामागे कौटुंबिक वाद, विवाहबाह्य संबंध तसेच कॉरिडॉरमधील मालमत्तेच्या वादाची शक्यता असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. मात्र, यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण…
संपत्तीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष झाल्याने महाद्वार चौक आणि मंदिर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. देवाच्या नगरीत अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
