पत्रकार बाबासाहेब सासणे ✍️✍️✍️
मंगळवेढा तालुक्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्राच्या शास्त्रीय संगीत क्षेत्रासाठी अत्यंत दुःखद अशी बातमी समोर आली असून, तालुक्याचे संगीतरत्न आणि शास्त्रीय संगीत क्षेत्रातील एक थोर व्यक्तिमत्त्व स्व. तुकाराम साखरे गुरुजी यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मंगळवेढा तालुकाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील संगीतप्रेमी, विद्यार्थी आणि कलाकारांमध्ये शोककळा पसरली आहे.
संगीतावर अपार प्रेम असणारं व्यक्तिमत्व
मंगळवेढा तालुक्यातील हाजापूर या छोट्याशा गावात वास्तव्यास असलेले साखरे गुरुजी आपल्या अमूल्य अशा शास्त्रीय संगीताच्या देणगीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जात होते. साधी राहणी, उच्च विचार आणि संगीतावरील अपार निष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खास वैशिष्ट्य होते. गावखेड्यात राहूनही त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर राज्यभरात नावलौकिक मिळवला.
महाराष्ट्रभर हजारो शिष्यगण तयार केले
शास्त्रीय संगीताची एक वेगळीच शैली साखरे गुरुजींकडे होती. गायन, हार्मोनियम वादन आणि तबलावादन या शास्त्रीय संगीतातील तिन्ही महत्त्वाच्या प्रकारांचा सुरेख मिलाफ त्यांच्या कलेत दिसून येत होता. विशेष म्हणजे हे तिन्ही प्रकार शिकवण्यासाठी सहसा वेगवेगळे शिक्षक असतात; मात्र साखरे गुरुजी हे तिन्ही प्रकार अत्यंत प्रभावी आणि शास्त्रीय पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवित असत. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले विद्यार्थी सर्वांगीण संगीतकार म्हणून घडले. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी हजारो शास्त्रीय संगीताचे विद्यार्थी घडवले. अनेक विद्यार्थी आज नामवंत गायक, वादक आणि शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. अनेक गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता शास्त्रीय संगीताचे दुर्मिळ आणि मौल्यवान प्रशिक्षण दिले. आर्थिक परिस्थिती आड येऊ न देता प्रत्येकातली कला घडवणे हेच गुरुजींचे खरे ध्येय होते.
स्व.तुकाराम साखरे गुरुजी यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात पोकळी
स्व. तुकाराम साखरे गुरुजी यांचे निधन हे मंगळवेढा तालुक्यापुरते मर्यादित नुकसान नसून, संपूर्ण महाराष्ट्राच्या शास्त्रीय संगीत क्षेत्रासाठी ही एक मोठी आणि न भरून निघणारी पोकळी आहे. त्यांच्या जाण्याने एक श्रेष्ठ गुरु, एक संवेदनशील कलाकार आणि एक आदर्श व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
त्यांच्या पश्चात असंख्य शिष्यवर्ग, संगीतप्रेमी आणि आप्तस्वकीय असा मोठा परिवार आहे. साखरे गुरुजींचे कार्य, त्यांची शिकवण आणि त्यांनी दिलेले संगीतसंस्कार कायम त्यांच्या विद्यार्थ्यांमधून आणि महाराष्ट्राच्या संगीतपरंपरेतून जिवंत राहतील, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.























