नंदेश्वर (प्रतिनिधी)
प्रत्येकाच्या जीवनात अनेक समस्या आहेत. वैयक्तिक समस्यांपासून सुरुवात होऊन ती जेव्हा सामाजिक समस्या बनते तेव्हा आपण तिचा विचार करतो पण तिच्या मुळाशी जात नाही. त्यामुळे आपणास त्यावर उपाय सापडत नाही. अध्यात्मिक मार्गाने त्यावर उपाय शोधता येतो. त्यामुळे मानवी जीवनात अध्यात्म हेच मूळ आहे त्यामुळे मानवी जीवनात अध्यात्माला खूप महत्त्व आहे असे प्रतिपादन श्री कोंडीराम महाराज मंदिराचे मठाधिपती तुकाराम महाराज यांनी केले. नंदेश्वर ता.मंगळवेढा येथे श्री कोडीराम महाराज पुण्यतिथी सप्ताह सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
श्री कोंडीराम महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताह सोहळ्याचे आयोजन नंदेश्वर येथे भक्तिभावात व उत्साहात पार पडले. सप्ताहभर चाललेल्या या सोहळ्यामध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात दररोज हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, भजन, महाप्रसाद आणि अध्यात्मिक चर्चा यांचे आयोजन झाले. स्थानिक तसेच परिसरातील नामवंत कीर्तनकार व प्रवचनकारांनी सहभाग घेत भक्तांना अध्यात्मिक मार्गदर्शन केले.
शेवटच्या दिवशी पालखी सोहळा, भजन-कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. गावातील व आजूबाजूच्या भागातील असंख्य भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या संपूर्ण सप्ताहासाठी गावातील कार्यकर्ते, सेवेकरी व मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि भक्तीमय वातावरणात पार पडल्याने भाविकांत समाधान व्यक्त करण्यात आले.
सोमवारी सकाळी १० वा.पासून श्रीक्षेत्र इंचगिरी मठाचे मठाधिपती रेवणसिद्ध महाराज, कोंडीराम महाराज मठाचे मठाधिपती श्री तुकाराम महाराज, अंबन्ना महाराज वळसंग या प्रमुख प्रवचनकारांसहित बजरंग फडतरे महाराज, विवेकानंद आरळी महाराज, दुधगे गुरुजी महाराज, देविदास महाराज, नवनाथ भंडारे महाराज, दत्तात्रय महाराज गुलबर्गा, ईश्वर सागर महाराज, सुभाष बोचरे महाराज, पुरुषोत्तम लवटे महाराज, सुनिता लवटे महाराज तनाळी, अभिमन्यू कांबळे महाराज, शशिकांत शिवनूर महाराज, व्हनमराठे सर महाराज, शिवाजी महाराज तनाळी यांचेही प्रवचन झाले. संपूर्ण सप्ताह काळात महिपती मोरे महाराज हाजापूर, जालिंदर चौगुले महाराज महिम, हरी घाडगे महाराज महिम यांचे कीर्तन झाले. शेवटी पुष्पवृष्टी होऊन महाप्रसादानंतर या पुण्यतिथी सप्ताह सोहळ्याची सांगता करण्यात आली.
