सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क
राज्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पाणंद रस्त्यांवर मुरूम टाकण्यासाठी यापुढे कोणतीही शासकीय परवानगी आवश्यक नाही, असा थेट आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात त्यांनी हा निर्णय जाहीर केला.
सोलापूर जिल्ह्यातील वादग्रस्त कुर्डू मुरूम प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या भूमिकेवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश देत सांगितले की, “पाणंद रस्त्यांवर मुरूम टाकण्यास कोणतीही परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.”
यावेळी बोलताना अजित पवार यांनी मिश्किलपणे, “हा निर्णय सोलापुरातही लागू करा, तिथे सांगायला विसरू नका,” असे म्हणत उपस्थितांमध्ये हशा पिकवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या टिप्पणीवर मोठ्याने हसले.
कुर्डू प्रकरणाची पार्श्वभूमी
काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू गावात बेकायदा मुरूम उपसा थांबवण्यासाठी गेलेल्या DYSP कृष्णा यांना थेट अजित पवार यांनी फोनवरून कारवाई थांबवण्याचे आदेश दिले होते. हे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर टीकेची झोड उठली. या प्रकरणामुळे त्यांना जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करावी लागली होती.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा…
या नव्या निर्णयामुळे राज्यातील ग्रामस्थांना व स्थानिक प्रशासनाला पावसाळ्यात खराब होणाऱ्या पाणंद रस्त्यांवर त्वरित मुरूम टाकण्याची मुभा मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे वाहतूक व दळणवळणाचे प्रश्न काही अंशी सुटणार असून, शासनाकडून लवकरच या आदेशासंदर्भात अधिकृत शासन निर्णय (GR) जारी होण्याची शक्यता आहे.
