(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथील महिला शेतकरी विद्या गेजगे आणि तायडा महादेव चौगुले यांनी शेजारी कार्यरत असलेल्या प्रज्वल सौर ऊर्जा कंपनीने त्यांच्या शेतात हेतुपुरस्सर पाणी सोडल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेत चौगुले यांच्या चार एकर शेतीचे मोठे नुकसान झाले असून, भरपाई न मिळाल्यास दोन्ही महिलांनी कुटुंबासह आत्महदहन करण्याचा इशारा दिला आहे. सध्या राज्यभरात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्या करताना दिसत आहेत. ही परिस्थिती समोर असताना मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान निसर्गनिर्मित नसून तर मानवनिर्मित संकटामुळे झाले असल्यामुळे शेतकऱ्यांनी नेमके जगायचे कसे हा प्रश्न उपस्थित होत आहे.
बांध व शासकीय नाल्याचे स्वरूप केले नष्ट…
प्राप्त माहितीनुसार, तायडा चौगुले व विद्या गेजगे यांची शेती प्रज्वल सौर ऊर्जा प्रकल्पाच्या सीमेलगत आहे. संबंधित कंपनीने सौर प्रकल्प उभारताना शेतातील बांध व शासकीय नाल्याचे स्वरूप नष्ट करून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला आहे. परिणामी, संपूर्ण पाणी चौगुले यांच्या शेतात शिरले आणि गुडघाभर पाण्यामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले.
नुकसान भरपाई न मिळाल्यास आत्मदहन करू….
आमच्या शेतात आम्हाला दरवर्षी चांगले उत्पन्न मिळत होते. मात्र यंदा शेतात पाणी साचल्याने पीक पूर्णतः नष्ट झाले असून, गुजराण करणेही कठीण झाले आहे. जर प्रज्वल कंपनीने झालेल्या नुकसानीची भरपाई दिली नाही, या उलट आम्हाला वेळोवेळी उडवा उडवीची उत्तरे दिली आहेत. तर आम्हाला कुटुंबासह आत्महदहन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही,” असे सौ. गेजगे आणि सौ.चौगुले यांनी यावेळी बोलताना सांगितले.
