नंदेश्वर / विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाबद्दल नंदेश्वर ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. संपूर्ण गाव कडकडीत बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गावातील सर्व व्यवहार, दुकाने, शाळा-महाविद्यालये स्वयंस्फूर्तपणे बंद ठेवून ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
श्रद्धांजली कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील प्रमुख चौकात सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेना माजी तालुकाप्रमुख अशोक चौंडे, शिक्षक नेते ज्ञानेश्वर मेटकरी, माजी ग्रामपंचायत सदस्य गुरुलिंग दोलतडे यांनी मनोगत व्यक्त करीत श्रद्धांजली वाहिली. उपस्थित मान्यवरांनी दिवंगत व्यक्तीच्या सामाजिक, राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील कार्याचा आढावा घेत आपल्या भावना व्यक्त केल्या.
वक्त्यांनी आपल्या मनोगतातून दिवंगतांचे कार्य, त्यांचा जनतेशी असलेला थेट संपर्क, तसेच समाजासाठी केलेले योगदान यावर प्रकाश टाकला. दिवंगतांचे जाणे ही समाजासाठी मोठी हानी असून त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील,अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी दोन मिनिटांचे मौन पाळून दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संपूर्ण गावाने दाखवलेली एकजूट आणि शिस्तबद्ध बंद ही त्यांच्या प्रती असलेल्या आदरभावनेचे प्रतीक असल्याची प्रतिक्रिया अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली.























