पत्रकार बाबासाहेब सासणे ✍️✍️✍️
पंढरपूर नगरीतील प्रसिद्ध भजन सम्राट स्व. जगन्नाथ वाडेकर बुवा यांचे काल दुर्दैवी निधन झाले. त्यांनी आपल्या पंढरपूर येथील निवासस्थानी शनिवार दि.११ रोजी वयाच्या ७६ व्या अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या भजन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, संपूर्ण भजनप्रेमी समुदाय शोकमग्न झाला आहे.
अनेक अभंग केले स्वरबद्ध..
अत्यंत गरीब कुटुंबात जन्म घेतलेले जगन्नाथ बुवा वाडेकर यांनी अपार कष्ट, चिकाटी आणि त्यांच्या अद्वितीय गायनशैलीच्या जोरावर महाराष्ट्राच्या भजनी परंपरेत स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या भजनांचा प्रभाव इतका खोलवर होता की, “निवृत्तीने बाहेर आणिले गोपाळा”, “आता कोठे धावे मन” यांसारखे अनेक अभंग त्यांच्या आवाजामुळे अधिक भावपूर्ण झाले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जपले भजन..
पंढरपूरमधील घडशी गल्लीत अत्यंत साधेपणाचे जीवन जगणाऱ्या जगन्नाथ बुवांनी मोठ्या संघर्षातून आपला भजनी प्रवास सुरू केला. त्यांच्या आवाजात एक विशिष्ट पहाडी झळाळी होती. मैफिलीत आलाप घेताच उपस्थितांच्या टाळ्यांचा गजर व्हायचा आणि प्रत्येकजण त्यांच्या अभंगाची आतुरतेने वाट बघायचा. त्यांच्या सादरीकरणातील निखळ भक्ती आणि गायकीतील अभ्यास यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
महाराष्ट्रातील नामवंत भजन सम्राटांपैकी एक..
महाराष्ट्रातील भजन क्षेत्रात पं. शंकरराव वैरागकर, भजनसम्राट तुकाराम बुवा गोसावी, पं. बाळासाहेब वाईकर, पं. रघुनाथ बुवा खंडाळकर यांच्यासारख्या दिग्गज भजन सम्राटांच्या यादीत स्व. जगन्नाथ वाडेकर बुवा यांचे नाव नेहमी सन्मानाने घेतले जाते. त्यांच्या भजनाच्या मैफिली श्रोत्यांना अध्यात्मिक समाधान आणि भक्तीरसात न्हाल्याचा अनुभव देत असत.
भजन शौकिनांच्या सदैव स्मरणात राहतील..
भजन क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानामुळे ते ‘भजनी रंगभूमीवरील एक अजरामर आवाज’ म्हणून सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या निधनामुळे केवळ पंढरपूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील भजन प्रेमींनी एक महान भजनीरत्न गमावले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 💐























