नंदेश्वर | प्रतिनिधी : भोसे जिल्हा परिषद गटाचे यशस्वी नेतृत्व याआधी केलेले माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणूक भोसे गटातून लढवावी, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष धनाजी गडदे यांनी केली आहे. या मागणीला भोसे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नामदेव जानकर यांनी आपल्या कार्यकाळात भोसे गटात विविध विकासकामे राबवून लोकांचा विश्वास संपादन केला होता. रस्ते, पाणीपुरवठा, ग्रामविकासाशी संबंधित प्रश्न तसेच सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, त्यामुळे भोसे परिसरात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती, असे कार्यकर्त्यांचे मत आहे.
गतवेळी अल्पमतात झालेला पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी
मात्र, गत जिल्हा परिषद निवडणुकीत नामदेव जानकर यांना अत्यंत अल्प मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. हा पराभव केवळ उमेदवारापुरता मर्यादित न राहता, भोसे गटातील कार्यकर्त्यांच्या मनाला लागून राहिल्याचे धनाजी गडदे यांनी सांगितले. “अल्प मतांनी झालेला पराभव आजही कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागलेला असून, त्या पराभवाची सल भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा नामदेव जानकर यांनी मैदानात उतरावे,” अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे, असे त्यांनी नमूद केले.

नामदेव जानकर यांच्या भूमिकेकडे लक्ष
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मागणी महत्त्वाची मानली जात असून, नामदेव जानकर या मागणीला कसा प्रतिसाद देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जर त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तर भोसे जिल्हा परिषद गटातील राजकारणाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.























