(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
अवकाळी पावसाने आणि हवामानातील अतिरेकी बदलांमुळे शेतकऱ्यांची अक्षरशः सत्वपरीक्षा सुरू आहे. एकीकडे पीक उभे राहत नाही, तर दुसरीकडे उभे पीक देखील पावसामुळे सडून जात आहे. अशा स्थितीत सरकारने तातडीने ओल्या दुष्काळाची घोषणा करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी, अशी जोरदार मागणी बहुजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. बापूसाहेब मेटकरी यांनी केली आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी उघड्यावर..
मंगळवेढा तालुका हा कर्नाटक सीमेलगत असलेला आणि पारंपरिक दुष्काळी पट्ट्यात मोडणारा भाग आहे. येथील शेतकरी पाण्यासाठी सातत्याने संघर्ष करत आला आहे. यंदा काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला असला, तरी सततचे ढगाळ वातावरण, मधूनच होणारा अवकाळी पाऊस आणि कधी प्रचंड उन्हाची लाट यामुळे मका, ज्वारी, भुईमूग, उडीद, मूग या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे.
दिवाळीच्या तोंडावर हताशतेचं वातावरण…
ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांपुढे मोठा आर्थिक पेच निर्माण झाला आहे. पेरणीसाठी घेतलेले कर्ज फेडायचे कसे? सण साजरा करायचा तरी कसा? या चिंतेत शेतकरी असून त्यांना योग्य वेळी मदत न मिळाल्यास आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येऊ शकते, असा इशाराही मेटकरी यांनी दिला.
शासनाने तातडीने पाहणी करून मदत जाहीर करावी..
सरकारने केवळ कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करावेत. ओल्या दुष्काळाची घोषणा करून शेतकऱ्यांना हेक्टरी आर्थिक मदत, बियाणे व खते अनुदानावर देण्यात यावे. शिवाय विमा कंपन्यांवर दबाव टाकून तातडीने नुकसान भरपाई वितरित करण्यात यावी,” अशी ठाम भूमिका ॲड. बापूसाहेब मेटकरी यांनी घेतली.
सत्ताधाऱ्यांची असंवेदनशीलता धोक्याची घंटा..
शेतकऱ्यांची ही स्थिती असताना प्रशासन व सत्ताधाऱ्यांकडून अजूनही कुठली ठोस पावले उचलली जात नसल्याची टीकाही मिटकरी यांनी केली. “शासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडतो आहे. ही केवळ नैसर्गिक आपत्ती नाही, तर नियोजनशून्यतेची शोकांतिका आहे,” असेही ते म्हणाले.
तळागाळातील शेतकऱ्यांचा आवाज बनण्याचे संकेत..
बहुजन प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देण्याची तयारी मेटकरी यांनी दर्शवली असून, पुढील काही दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही ॲड. बापूसाहेब मेटकरी यांनी दिला आहे.
