मंगळवेढा (प्रतिनिधी)
मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी दक्षिण भागातील दुष्काळी 24 गावांची मंगळवेढा उपसा सिंचन ही योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर असून, मंगळवेढा उपसा सिंचन योजना पूर्णत्वासाठी आमदार समाधान आवताडे यांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर पावले उचलली जात असल्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचणार असल्याची माहिती नंदेश्वर येथील युवक नेते दत्ता साबणे यांनी दिली.

आ.समाधान आवताडे यांचे प्रामाणिक प्रयत्न..
दत्ता साबणे म्हणाले, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून हा ऐतिहासिक उपक्रम साकार होत असून, अनेक वर्षांचा पाणीप्रश्न मिटण्याची आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. मंगळवेढा तालुक्याचे अनेक लोकप्रतिनिधींनी प्रतिनिधित्व केले, मात्र पाणीप्रश्न सोडविण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रामाणिक प्रयत्न फक्त आमदार समाधान आवताडे यांनी केले. त्यांनी मंगळवेढा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी पुढाकार घेतला आहे.

शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत..
यावेळी त्यांनी पुढे सांगितले की, “दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आमदार आवताडे यांनी जलसिंचन योजनांना गती देत विविध प्रलंबित प्रकल्प मार्गी लावले. त्यामुळे येत्या काही काळात मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील कोरडवाहू शेतीला पाण्याचा शाश्वत पुरवठा होणार आहे.या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, दुष्काळग्रस्त भागाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वासही दत्ता साबणे यांनी व्यक्त केला.






















