नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील ख्यातनाम अस्थिरोग तज्ञ डॉ. नितीन चौंडे यांना साप्ताहिक रणयुग टाइम्सच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या “आरोग्यरत्न” या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय, सेवाभावी आणि निःस्वार्थ कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्याला उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरण लाभले. आ.समाधान आवताडे यांच्या हस्ते डॉ. चौंडे यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि शाल-श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यावेळी दैनिक दामाजी एक्सप्रेस चे संपादक दिगंबर भगरे, साप्ताहिक रणयुग टाइम्सचे संपादक प्रमोद बिनवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंगळवेढा तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्हा मध्ये डॉ. नितीन चौंडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य सेवेत मोलाचे योगदान दिले आहे. ग्रामीण व दुर्बल घटकांपर्यंत दर्जेदार वैद्यकीय सेवा पोहोचवण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे. विशेषतः अपघातग्रस्त व हाडांच्या आजारांनी त्रस्त रुग्णांवर त्यांनी अत्याधुनिक उपचार पद्धतींचा वापर करून यशस्वी उपचार केले आहेत.
डॉ. चौंडे यांची कार्यशैली ही केवळ व्यावसायिक न राहता सेवाभावी आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार देणे, गरजूंना मोफत मार्गदर्शन करणे, तसेच आरोग्य शिबिरे आयोजित करून जनजागृती करणे या माध्यमातून त्यांनी समाजात आरोग्याबाबत जागरूकता निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्यामुळे हजारो रुग्णांना नवसंजीवनी मिळाली असून, त्यांनी लोकांच्या मनात विश्वासार्ह डॉक्टर म्हणून विशेष स्थान मिळवले आहे.
संपादक प्रमोद बिनवडे यांनी आपल्या मनोगतातून नमूद केले की, समाजातील कर्तृत्ववान आणि सेवाभावी व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी रणयुग टाइम्स नेहमीच पुढाकार घेत असते. डॉ. चौंडे यांचे कार्य हे प्रेरणादायी असून, त्यांच्या सन्मानातून इतरांनाही समाजसेवेची प्रेरणा मिळेल. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.“आरोग्यरत्न” पुरस्कारामुळे डॉ. नितीन चौंडे यांच्या कार्याला नवे बळ मिळणार असून, भविष्यातही ते याच सेवाभावी वृत्तीने समाजासाठी कार्यरत राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.























