सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क:
नंदेश्वर गावातील विविध भागांमध्ये बसविण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरखाली साचणाऱ्या चिखलामुळे गवतामुळे महावितरणच्या लाईनमनला देखभाल व दुरुस्ती करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ही परिस्थिती अधिकच गंभीर बनली असून, लाईनमनच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नंदेश्वरचे माजी उपसरपंच राहुल कसबे यांनी केली आहे.
सिमेंट काँक्रीटचे प्लॅटफॉर्म तयार करणे गरजेचे…
गावठाणासह शेतशिवारामध्ये बसविण्यात आलेले ट्रान्सफॉर्मर हे बहुतेक वेळा गवताचे साम्राज्य असलेल्या व चिखलयुक्त ठिकाणी आहेत. पावसात विजपुरवठा खंडित झाल्यानंतर लाईनमनना रात्रीच्या वेळी ट्रान्सफॉर्मरजवळ जाऊन दुरुस्ती करणे अत्यंत धोकादायक ठरते. प्रत्येक ट्रान्सफॉर्मरखाली १० बाय १० फूटांचे सिमेंट काँक्रीटचे प्लॅटफॉर्म तयार करण्यात यावेत, अशी ठाम मागणी महावितरण कंपनीकडे केली आहे. त्यामुळे दुरुस्ती दरम्यान लाईनमनला कोणतीही अडचण येणार नाही, तसेच अपघातांची शक्यता कमी होईल. ही बाब लाईनमनच्या जीवितास धोकादायक ठरू शकते. त्यामुळे महावितरणने याची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर ठोस उपाययोजना कराव्यात असे कसबे यांनी म्हटले आहे. गावकऱ्यांनीही या मागणीस पाठिंबा दर्शवला असून, संभाव्य दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी महावितरणने तत्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
