सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क..
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत माजी आमदार स्व. भारतनाना भालके यांच्या सुनबाई आणि स्व. भारतनाना भालके फाउंडेशनच्या संचालिका सौ. प्रणिताताई भगीरथ भालके यांच्या पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. स्व. भारतनाना भालके हे सर्वसामान्यांचे नेते म्हणून परिचित होते. त्यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा विजय मिळवत आपल्या जनसामान्यांशी जोडलेल्या नेतृत्वाची ठसठशीत छाप सोडली होती. त्यांच्या अचानक निधनानंतर मतदारसंघात विकासाची गती थांबली असल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.
प्रणिताताई सामाजिक कार्यात अग्रेसर
त्यानंतर प्रणिताताई भालके यांनी सामाजिक कार्याची जबाबदारी सांभाळत सातत्याने जनतेच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यात स्व. भारतनानांची प्रतिमा दिसते, असा सूर अनेक कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळत आहे.नुकत्याच घोषित झालेल्या पंढरपूर नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणात हे पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे प्रणिताताई भालके यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली असून, शहरात तसेच संपूर्ण मतदारसंघात त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
प्रणिताताईंच्या उमेदवारीच्या चर्चेने खळबळ
विशेष म्हणजे भगीरथ भालके यांनी विधानसभा निवडणुकीत दोनवेळा उमेदवारी घेतली होती, त्यावेळी त्यांच्या प्रचाराची धुरा प्रणिताताईंनी नेटाने सांभाळली होती. त्यामुळे प्रशासन, प्रचार आणि जनतेशी संवाद यामध्ये त्यांचा अनुभव लक्षात घेता, नगराध्यक्ष पदासाठी त्यांची उमेदवारी नाकारता येणार नाही, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.या चर्चेने विरोधकांमध्येही खळबळ उडाली असून, प्रणिताताई भालके यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे आगामी स्थानिक निवडणुका रंगतदार होण्याची चिन्हं आहेत.
