सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क..
श्री बाळकृष्ण माऊलींच्या १२५ व्या जयंतीनिमित्त एक भव्य आणि पवित्र नामजप यज्ञ आयोजित करण्यात येत आहे. देवसागर साधक समाज आणि माऊली सेवा मंडळाच्या वतीने १३ कोटी श्रीराम नामजप यज्ञाचा संकल्प करण्यात आला असून, या यज्ञात सहभागी होण्याचे आवाहन बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज यांनी केले आहे.
या उपक्रमाची सुरुवात माऊलींच्या पुण्यतिथी सप्ताहापासून होणार असून, २०२६ साली होणाऱ्या गोकुळ जन्माष्टमी सोहळ्यानिमित्त म्हणजेच बाळकृष्ण माऊलींच्या १२५ व्या जयंती सोहळ्याचे औचित्य साधून यज्ञ पूर्णत्वास नेण्यात येईल.
लिखित स्वरूपात नामजप यज्ञ होणार..
या यज्ञात लिखित नामजप करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष वह्या छापण्यात आलेल्या असून, इच्छुक भक्तांना त्या वाटप करण्यात येत आहेत. प्रत्येक वहीमध्ये:११६ पाने असतील,प्रत्येक पानावर सुमारे ५४६ श्रीराम नामजप,एकूण एका वहीमधून ६३,००० नामजप होतील. अशा प्रकारे संपूर्ण यज्ञात १३ कोटी श्रीराम नामजप पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
नामजप महायज्ञ म्हणजे भक्ती, सेवा आणि सामूहिक साधनेचे अनुपम उदाहरण – बाळासाहेब महाराज
सदर वह्या मिळवण्यासाठी आणि नामजप यज्ञात सहभागी होण्यासाठी भाविकांनी श्री बाळकृष्ण माऊली मंदिर, नंदेश्वर येथे संपर्क साधावा, असे आवाहन बाळासाहेब महाराज यांनी केले आहे. हा नामजप महायज्ञ म्हणजे भक्ती, सेवा आणि सामूहिक साधनेचे अनुपम उदाहरण ठरणार असून, सर्व भक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन माऊलींच्या जयंती सोहळ्यास पावन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
