भोसे / विशेष प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. तालुक्यातील सर्वाधिक लक्षवेधक ठरलेल्या भोसे जिल्हा परिषद गटातून भाजपने माजी पंचायत समिती सभापती प्रदीप खांडेकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित केल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपने या गटात स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.

प्रदीप खांडेकर यांच्या भेटीगाठी
भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी भोसे गटातून प्रदीप खांडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची जोरदार चर्चा असून, यानंतर खांडेकर यांनी मतदारसंघात भेटीगाठी, संपर्क दौरे सुरू केले आहेत. यामुळे आमदार आवताडे आणि खांडेकर यांनी निवडणुकीसाठी रणनिती आखत आघाडी घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. विशेष म्हणजे भोसे गटासह इतर तीन जिल्हा परिषद गटांचे उमेदवारही आमदार आवताडे यांनी अंतिम केल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
विरोधी गोटात एकमत होईना
दुसरीकडे भाजपविरोधी महाविकास आघाडी किंवा समविचारी आघाडी यांच्याकडून अद्याप ठोस उमेदवार निश्चित झालेला नसल्याचे दिसत आहे. चर्चेच्या एक-दोन फेऱ्या झाल्या असल्या तरी एकमत न झाल्याने विरोधी गोटात संभ्रमाचे वातावरण आहे. भोसे जिल्हा परिषद गटातून भाजपविरोधी आघाडीकडून भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, श्री संत दामाजी कारखान्याचे संचालक बसवराज पाटील आणि काँग्रेसचे प्रदेश सचिव अॅड. रविकिरण कोळेकर हे तिघे इच्छुक असल्याची माहिती आहे. याशिवाय नंदेश्वर येथील श्री बागडेबाबा दूध संस्थेचे चेअरमन दादासाहेब दोलतडे हे देखील भोसे जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. मात्र, ते कोणत्या पक्ष अथवा आघाडीकडून निवडणूक लढवणार याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. मात्र निवडणूक लढविणार हे निश्चित असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ यांनीही भोसे जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढविण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यांच्या भूमिकेकडेही सध्या लक्ष लागून राहिले आहे.

आजच्या बैठकीकडे लक्ष
सत्ताधारी भाजपने उमेदवारी जाहीर करून निवडणुकीत आघाडी घेतली असताना, विरोधी आघाडी मात्र अजूनही चर्चेच्या फेऱ्यांत अडकलेली दिसत आहे. दरम्यान, आज शनिवार, दिनांक १७ रोजी समविचारी आघाडी किंवा महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. या बैठकीत भोसे जिल्हा परिषद गटासह इतर गटांबाबत निर्णय होणार का, की चर्चेचाच सिलसिला पुढे चालू राहणार, याकडे संपूर्ण मंगळवेढा तालुक्याचे लक्ष लागले आहे. एकूणच भोसे जिल्हा परिषद गटातील लढत रंगतदार ठरण्याची चिन्हे असून, आगामी काही दिवसांत राजकीय समीकरणे वेगाने बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.























