नंदेश्वर/ प्रतिनिधी : नंदेश्वर येथील ग्रामपंचायत सदस्य काशिलिंग करे यांनी नूतन वर्षाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी व बालकांसाठी एक स्तुत्य उपक्रम राबविला. नंदेश्वर येथील श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेज तसेच परिसरातील सर्व जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांना तब्बल १२५ किलो जिलेबीचे व खाऊचे वाटप करण्यात आले.

ग्रामपंचायत सदस्य काशिलिंग करे हे नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असतात. शिक्षण, आरोग्य व सामाजिक क्षेत्रात त्यांनी यापूर्वीही अनेक उपक्रम राबविले असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. नूतन वर्षाच्या निमित्ताने लहान मुलांना आनंद देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे शाळा व अंगणवाड्यांतील बालकांमध्ये नववर्षाचा उत्साह द्विगुणित झाला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. काशिलिंग करे यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल पालकवर्गातूनही समाधान व्यक्त करण्यात आले असून, ग्रामस्थांकडून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जात असून, सामाजिक सलोखा अधिक दृढ होण्यास मदत होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
























