मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी : श्री संत चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळ, हुन्नूर संचलित माध्यमिक आश्रम शाळा, हुन्नूर येथील कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक गुरुदेव काशिनाथ स्वामी यांना यावर्षीचा सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित, बाळे–सोलापूर यांचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर झाला आहे.
गुरुदेव स्वामी यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे, शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणे तसेच सामाजिक व शैक्षणिक जबाबदारी जपणे यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्यामुळे शाळेची शैक्षणिक प्रगती व लौकिक वाढला आहे. या पुरस्काराच्या घोषणेमुळे श्री संत चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध स्तरांतून मा. गुरुदेव काशिनाथ स्वामी यांचे अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. श्री संत चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रमुख तथा काँग्रेस चे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी गुरुदेव स्वामी यांचे अभिनंदन केले.























