सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क : राज्यभरातील २९ महापालिकांच्या रणधुमाळी सुरू असतानाच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्याही तयारीला सुरुवात झाली आहे. दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा याच आठवड्यात होणार असल्याचे संकेत राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिले आहेत. विशेष म्हणजे, ५० टक्के आरक्षणाची मर्यादा न ओलांडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच निवडणुका यावेळी घोषित करण्यात येणार आहेत.

उमेदवारी अर्ज, छाननी आणि चिन्ह वाटप यासारख्या प्रक्रियेतून पुढे गेलेल्या निवडणुकांच्या प्रचाराला आता रंग चढू लागला असून जेमतेम १० दिवस मतदानासाठी उरले आहेत. निवडणुकीसाठीच्या प्रक्रियेचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता केवळ मतदान आणि मतमोजणी हे दोनच टप्पे शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तयारीला सुरूवात झाली आहे. राज्यात ३२ जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समित्या असून त्यापैकी १७ परिषदा आणि ८८ समित्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मर्यादेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे नियोजन राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू करण्यात आले आहे.
सध्या जवळपास २९ जिल्ह्यांतील संपूर्ण यंत्रणा ही महापालिका निवडणुकांमध्ये गुंतली आहे. त्याचबरोबर काही महापालिकांमध्ये निर्माण होणारी तणावपूर्ण परिस्थिती पाहता अतिरिक्त अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक महापालिका निवडणुकीनंतर घेण्यात येतील, असे निवडणूक आयोगातील सूत्राने स्पष्ट केले. या निवडणुका ३१ जानेवारीआधी घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे असून त्यामुळे त्यांची घोषणाही लवकरात लवकर होईल, असेही सूत्रांनी सांगितले.























