मोहोळ / तालुका प्रतिनिधी
कुरुल बीटअंतर्गत आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेत कोथाळे जिल्हा परिषद शाळेने सर्वसाधारण विजेतेपद पटकावत दमदार कामगिरीची छाप पाडली. कोथाळे जिल्हा परिषद शाळेत झालेल्या चार केंद्रांच्या क्रीडा स्पर्धांमध्ये कोथळे शाळेतील खेळाडूंनी तीन सांघिक आणि दोन वैयक्तिक प्रकारात अव्वल स्थान पटकावले.
सांघिक स्पर्धांत खो-खो लहान गट मुले, मोठा गट मुले व मोठा गट मुली या तिन्ही संघांनी विजेतेपद मिळवून शाळेचा झेंडा उंचावला. वैयक्तिक क्रीडा प्रकारात 100 मीटर धावणे या स्पर्धेत कु. शाईन फिरोज शेख तर 200 मीटर धावण्यात स्नेहल दत्तात्रय भोसले यांनी प्रथम क्रमांकाची बाजी मारली. सर्वांगीण उत्तम कामगिरीमुळे विजेते ठरलेले तीनही संघ तसेच दोन्ही वैयक्तिक विजेत्यांची आगामी तालुका स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट यशाबद्दल राजेश पवार, दत्तात्रय मोटकुळे, सविता पवार, सुनील केदार, विकास पवार, राज माने, विशाल पवार, नवनाथ पवार, विवेक पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. या खेळाडूंना मुख्याध्यापक नेताजी रणदिवे, तसेच वर्षा वाघ, पांडुरंग इर्लेकर, शितल आंधळकर, सुशेन क्षीरसागर आणि प्रियांका पवार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कोथळे शाळेच्या या चमकदार कामगिरीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून तालुका स्तरावरही खेळाडू यशाचा ठसा उमटवतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.























