सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क
मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भाजप विरुद्ध तीर्थक्षेत्र विकास आघाडी अशी लढत सध्या होत आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यात गत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचे ठरलेले तुतारी चिन्ह गायब झालेले असताना मंगळवेढा नगरपालिकेत मात्र राष्ट्रवादीचे नेते आणि भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत आणि त्यांच्या शिलेदारांनी एकूण सहा उमेदवार रणांगणात उभे केले आहेत. त्यामुळे एकीकडे तुतारी चिन्हावरचे म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार नगरपालिका निवडणुकीत निष्क्रिय ठरलेले असताना अनिल सावंत आणि त्यांच्या शिलेदारांनी मंगळवेढा नगरपालिकेचा उमेदवार उभे केले असल्यामुळे सध्या ते जिल्ह्यात चर्चेचा विषय होत आहेत.
अकलूज वगळता तुतारी कुठेच वाजले नाही
मात्र, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली अकलूज नगरपालिका वगळता एकाही आमदाराने अधिकृत ‘तुतारी’ या चिन्हावर निवडणूक लढवली नाही. याच पार्श्वभूमीवर मंगळवेढा तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते व भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, ज्येष्ठ नेते राहुल शहा, शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी आणि त्यांच्या शिलेदारांनी मात्र तुतारीची पताका उंचावत नगरपालिकेत निवडणूक लढविली आहे.
अनिल सावंत आणि त्यांच्या शिलेदारांनी मंगळवेढा नगरपालिकेत तुतारी वाजविली
अनिल सावंत आणि त्यांच्या शिलेदारांनी मंगळवेढा नगरपालिकेतील पाच नगरसेवक उमेदवारांना तुतारीच्या चिन्हावर उभे केले असून, त्यातील किमान दोन उमेदवार निश्चित विजयी होणार, असा विश्वास पक्षातून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मंगळवेढा नगरपालिकेत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे खाते उघडणारच, अशी खात्रीशीर चर्चा शहरभर रंगली आहे.
बालेकिल्ल्यातील चार आमदार निष्प्रभ
जिल्ह्यातील चार विजयी आमदारांची कामगिरी
करमाळा – आमदार नारायण पाटील,माळशिरस – आमदार उत्तम जानकर,माढा – आमदार अभिजीत पाटील,मोहोळ – आमदार राजू खरे यापैकी माळशिरस तालुक्यातील अकलूज नगरपालिका खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढविली जात असून, त्या ठिकाणीही पक्षाने मजबूत लढत दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील राजकीय चित्र अधिक रंगतदार होत असून, मंगळवेढ्यात ‘तुतारी’चा आवाज कसा घुमतो हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.























