(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथे शनिवारी मध्यरात्री शेतीचे साहित्य चोरी होण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संजय ज्ञानू करे या शेतकऱ्याच्या शेतातील शेतातून एसटीपी मशीन आणि पाण्याची मोटार चोरट्यांनी लंपास केली. संजय करे हा सकाळी आपले द्राक्षाची बाग फवारण्यासाठी गेल्यानंतर त्याच्या हा प्रकार लक्षात आला. गेल्या काही दिवसांपासून नंदेश्वर परिसरात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, शनिवारी रात्री पुन्हा एकदा शेतातील महत्त्वाचे साहित्य चोरीला गेले आहे.
संजय करे यांच्या शेतात दुसऱ्यांदा चोरी…
याआधी संजय करे यांच्या शेततळ्याजवळ बसवलेली मोटार पुन्हा त्यांच्यावरच अशी दुसरी मोठी आपत्ती ओढवली असून, एकूणच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान दिवसेंदिवस वाढत आहे. वारंवार आमच्या शेतातील शेती साहित्याची चोरी होत आहे. शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने माझ्या द्राक्षाच्या बागेत जवळ फवारणीसाठी ठेवलेले एसटीपी आणि मोटर पाईप तोडून चोरले आहे. आम्ही किती वेळा त्रास सहन करायचा आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी संजय करे यांनी केली आहे.
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण….
नंदेश्वर व परिसरातील शेतकरी सध्या रात्रीच्या वेळेस फारच अस्वस्थ असून, त्यांच्या पिकांप्रमाणेच शेतीसाठी लागणाऱ्या महागड्या साधनांची चोरी ही नवी डोकेदुखी बनली आहे. चोरट्यांचे धाडस इतके वाढले आहे की, ते थेट शेततळ्याजवळील पंप सेट, वायर, यंत्रणा, वीज पुरवठा साहित्य उचलून नेत आहेत.
प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष..?
गावात पोलीस चौकी असूनही चोरीच्या घटनांत वाढ झाल्याने स्थानिक प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस कर्मचारी आउटपोस्टवर वास्तव्यास राहत नसल्याने सुरक्षा व्यवस्था ढासळली आहे, अशी तक्रार ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात आहे.
ग्रामस्थांची मागणी..
गावात सतत पोलीस गस्त वाढवावी,आऊटपोस्टमध्ये कायमस्वरूपी पोलीस मुक्काम ठेवावा,मागील सर्व चोऱ्यांचा तपास लावून गुन्हेगारांना अटक करावी,चोरी रोखण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी. नंदेश्वर गावात पोलीस आउटपोस्ट (Police Outpost) असला तरी तेथे नियमित पोलीस कर्मचारी मुक्कामी राहत नाहीत. परिणामी चोरट्यांचे फावते असून गावात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत.
पाळीव जनावरे चोरण्याचेही अनेक प्रकार..
शेतकऱ्यांच्या शेतीतील साहित्य चोरी होण्याच्या प्रकारासह शेतकऱ्यांचे पाळीव जनावरे देखील चोरी होण्याच्या अनेक प्रकार च्या ग्रामीण भागात घडताना दिसत आहेत. जनावरे चोरीच्या या नव्या प्रकारामुळे शेतकरी भयभित अवस्थेत आहेत. या घटनांमुळे नंदेश्वर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची त्वरीत दखल घेऊन कठोर कारवाई केली नाही, तर स्थानिक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर होईलच, पण कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
