सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क…
भोसे जिल्हा परिषद गटातील रड्डे पंचायत समिती गण अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव असून या गणातून चळवळीतील प्रामाणिक कार्यकर्ता आणि रड्डे गावचे माजी सरपंच सुरेश कांबळे यांना महाविकास आघाडी किंवा समविचारी आघाडीतून उमेदवारी मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष धनाजी गडदे यांनी केली आहे.

विकासाभिमुख नेतृत्व..
सुरेश कांबळे यांनी सरपंच पदाची जबाबदारी पार पाडताना विकासाभिमुख कार्याचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी रड्डे गावच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले आहेत. त्याचबरोबर सामाजिक चळवळीत सक्रिय राहून त्यांनी तालुक्यात आपली ठसठशीत ओळख निर्माण केली आहे.

सुरेश कांबळे यांना उमेदवारी दिल्यास मनसे कार्यकर्ते प्रयत्न करतील…
धनाजी गडदे म्हणाले की, सुरेश कांबळे यांच्यासारख्या प्रामाणिक आणि विकासाभिमुख नेतृत्वाला उमेदवारी मिळाल्यास रड्डे गणाचा विकास हमखास होईल. त्यामुळे महाविकास आघाडीकडून किंवा समविचारी आघाडीच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी द्यावी. रड्डे पंचायत समिती गणात मनसेचे कार्यकर्ते सुरेश कांबळे यांच्या पाठीशी उभे असून, त्यांच्या विजयासाठी सर्व ताकद पणाला लावतील. तसेच, महाविकास आघाडी अथवा समविचारी आघाडीच्या विजयासाठी देखील मंगळवेढा तालुक्यातील मनसेचे सर्व कार्यकर्ते कटिबद्ध राहतील, असेही त्यांनी नमूद केले.रड्डे गणातील उमेदवारीसाठी आता सुरेश कांबळे यांचे नाव चर्चेत असून, येत्या निवडणुकीत या गणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.























