नंदेश्वर / विशेष प्रतिनिधी : सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेला प्रेरणा परिवार आता थेट राजकारणात प्रवेश करणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती प्रेरणा उद्योग समूहाचे मालक बाळासाहेब सलगर यांनी दिली आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही माहिती देण्यात आली आहे. प्रेरणा परिवाराला आगामी नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणूक लढवायची असून, त्या अनुषंगाने जो पक्ष किंवा आघाडी प्रेरणा परिवाराला नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी ठामपणे मदत करेल, त्या पक्षाला प्रेरणा परिवार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये पूर्ण सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट मत बाळासाहेब सलगर यांनी व्यक्त केले आहे.
आजपर्यंत प्रेरणा परिवाराने केवळ सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनतेशी नाते जोडले होते. विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, विविध सामाजिक संस्थांना सहकार्य, महापुरुषांच्या जयंती व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन अशा अनेक उपक्रमांमुळे प्रेरणा परिवाराची ओळख समाजाभिमुख परिवार अशी आहे.
याबाबत बोलताना मा. बाळासाहेब सलगर म्हणाले की, सामाजिक कार्य करत असताना जनतेच्या अनेक मूलभूत प्रश्नांना सामोरे जावे लागते. हे प्रश्न प्रभावीपणे सोडवायचे असतील तर राजकीय सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे आता सामाजिक कार्यासोबतच राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष बाब म्हणजे मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात प्रेरणा परिवाराचा मोठा जनसंपर्क असून, प्रेरणा परिवाराचे मार्गदर्शक मेजर दत्ता सलगर यांचा स्नेहबंध मोठा आहे. राजकारणात प्रवेश करण्याच्या निर्णयामुळे मंगळवेढा तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये प्रेरणा परिवार एक महत्त्वाचा घटक ठरणार आहे.























