मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देणारे, त्यांना आत्मविश्वासाने उभे करणारे नेते होते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ यांनी केले. स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत ते बोलत होते. या सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नेते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सभास्थळी शोकाकुल वातावरण होते.
सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारा नेता
रामेश्वर मासाळ पुढे म्हणाले की, स्व. अजितदादा पवार हे केवळ सत्ताकेंद्रात राहणारे नेते नव्हते, तर ते सातत्याने ग्राउंड लेव्हलपर्यंत लक्ष ठेवून काम करणारे नेतृत्व होते. ग्रामीण भागातील प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी, कार्यकर्त्यांच्या समस्या यांची त्यांना नेहमीच जाण होती. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्याच्या कामाच्या आणि पदाच्या योग्यतेप्रमाणे न्याय देण्याची भूमिका त्यांनी कायम जपली. पक्षाचा साधा कार्यकर्ता असो किंवा मोठा पदाधिकारी प्रत्येकाशी थेट संवाद साधणे, त्याला विश्वासात घेणे आणि गरज पडल्यास त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच स्व. अजितदादांची खरी ओळख होती,” असेही मासाळ यांनी नमूद केले. यावेळी त्यांना भावना आवरता न आल्याने ते भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
गोणेवाडीतही वाहिली अजितदादांना श्रद्धांजली
दरम्यान, गोणेवाडी गावातही समस्त ग्रामस्थांच्या वतीने स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गावकऱ्यांनी एकत्र येत त्यांच्या कार्याचा, नेतृत्वाचा आणि सामान्य जनतेशी असलेल्या नात्याचा गौरव केला. स्व. अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला. स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या कार्याची आणि नेतृत्वाची उणीव कायम भासेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

स्व. अजितदादा आणि रामेश्वर मासाळ यांचे ऋणानुबंध
गेल्या अनेक वर्षांपासून स्व. अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ यांचे ऋणानुबंध मंगळवेढा तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात सर्वश्रुत होते. हा संबंध केवळ राजकीय मर्यादेत न राहता विश्वास, आपुलकी आणि परस्पर सन्मानावर आधारित होता. मंगळवेढा तालुक्यातील विविध विकासकामे, ग्रामीण भागातील पाणीप्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी, कार्यकर्त्यांचे प्रश्न तसेच पक्षसंघटनात्मक बाबींमध्ये स्व. अजितदादा पवार यांनी रामेश्वर मासाळ यांच्यावर नेहमीच विश्वास दाखवला. मासाळ यांनी मांडलेल्या स्थानिक प्रश्नांना दादांनी प्राधान्य देत शासनस्तरावर पाठपुरावा केला.























