माळशिरस (तालुका प्रतिनिधी)
माळशिरस तालुक्यातील अकलूज नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोहिते–पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजप यांच्यात चुरशीची टक्कर पाहायला मिळाली. ही निवडणूक २ डिसेंबर रोजी पार पडली असून, निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष खिळले आहे.
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
अकलूज नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली तर भाजपच्या वतीने माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यात आली. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनीही भाजप उमेदवारांच्या प्रचाराला मोठी ताकद दिली. त्यामुळे खासदार धैर्यशील मोहिते–पाटील, पालकमंत्री गोरे आणि माजी आमदार राम सातपुते यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.
पैजा,अफवा,भागिते..
दरम्यान, अकलूज शहरात निकालाची चर्चा चांगलीच रंगली असून वेगवेगळ्या अफवा, भाकिते आणि पैजांचे फेरेही दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर दादा तरंगे आणि मच्छिंद्र कर्णवर या दोन व्यक्तींमध्ये नगराध्यक्षपदावर कोणाची निवड होणार याची उत्सुकता एवढी वाढली की चक्क बुलेट मोटारसायकलची शर्यत लावून पैज धरल्याची चर्चा शहरात रंगत आहे. निवडणुकीचा निकाल काय येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून येत्या 21 डिसेंबर रोजी निकाल लागणार असून अकलूजमध्ये राजकीय तापमान चांगलेच चढले आहे.























