पंढरपूर /प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत हेच आहेत. सावंत यांना पवार साहेबांचा आशीर्वाद आहे हे मतदारांनी लक्षात ठेवावे. भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिली होती. मात्र पवार साहेबांनी निर्णय घ्यायचा अगोदरच त्यांनी वेगळी भूमिका घेतली. पवार साहेबांच्या निर्णयाची वाट न बघता इतर पक्षातून उमेदवारी घेत पवार यांचा अपमान करणाऱ्या उमेदवाराला त्याची जागा दाखवण्याची ही वेळ आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिवतीर्थ पंढरपूर या ठिकाणी 15 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. प्रचार सभेत जयंत पाटील बोलत होते.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे, पक्षनिरीक्षक शेखर माने, राहुल शहा, रवी पाटील, वसंतनाना देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप मांडवे, शहराध्यक्ष सुभाष भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी, रवी मुळे, डॉ.संजयकुमार भोसले, संतोष नेहतराव, गंगेकर, सुधीर भोसले, सुधील अभंगाराव, , प्रथमेश पाटील , चंद्रशेखर कोंडुबहिरे, दिपकदादा वाडदेकर, सागर पडगळ, संजय शिंदे, मुन्ना भोसले,महिला आघाडीच्या पदाधिकारी सुवर्णाताई शिवपुरे, पूनम अभंगराव, राजश्री ताड, वृषाली इंगळे, शुभांगी ताई, साधना राऊत , चारुशीला कुलकर्णी, पूर्वा ताई, अनिता पवार ,सुनंदा उमाटे , रेखा ताई, काजल भोरकडे यांचेसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, देशात प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगारी, महागाई, शेतकरी संतप्त आहे. मात्र या मूलभूत समस्यांकडे बघायला भाजपला वेळ नाही. भाजप फक्त जाती धर्मांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहे. म्हैसाळच्या पाण्याचा प्रश्न आम्ही सोडविणार. मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्न आमचेच सरकार सोडवणार. तसेच पंढरपूर शहर आणि तालुक्यातील प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. समोर जरी काँग्रेसचा उमेदवार असला तरी या लढतीचे विश्लेषण करायचं झालं तर ही मैत्रीपूर्ण लढत होईल. मात्र अनिल सावंत यांना शरद पवारांचे आशीर्वाद आहेत, ते विसरू नका.
*************
कामचुकार सालगडी बदला
गतवेळी विद्यमान लोकप्रतिनिधीला माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी निवडून आणले. पण यावेळी मात्र प्रशांत परिचारक यांना उमेदवारी देताना याच माणसाने खोडा घालत स्वतःला उमेदवारी मिळवून घेतली. ही घटना परिचारकांचे समर्थक विसरले नाहीत. विद्यमान लोकप्रतिनिधींनी जसे परिचारकांना फसवले तसेच ज्या मतदारांनी वादळात दिवा लावला त्या मतदारांना देखील फसविले आहे. त्यामुळे सालगडी कामचुकारपणा करायला लागल्यानंतर त्याला बदलले पाहिजे. पंढरपूर मंगळवेढ्यातील जनतेने देखील यंदा सालगडी बदलला पाहिजे. तसेच नोटरीचेबल असणारा माणूस मतदारसंघाचा विकास कितपत करेल याविषयी मतदारांच्या मनात शंका आहेत. त्यामुळे पंढरपूर आणि मंगळवेढ्यातील जनतेने यावेळी माझ्यावर विश्वास ठेवून मला एकदा संधी द्यावी मी मतदार संघात प्रश्न शिल्लक ठेवणार नाही.
अनिल सावंत
उमेदवार
*************
बटेंगे तो कटेंगे नाहीतर पढेंगे तो बचेंगे
देशात आणि राज्यात भाजपचीच सत्ता आहे तरीही हिंदू कसा काय धोक्यात आहे. भाजपाने राज्यात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी बटेंगे तो कटेंगे ही नवीन आयडिया काढली आहे. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणारी भाजपा अठराव्या शतकातून बाहेर निघायला तयार नाही. 21 व्या शतकात पढेंगे तो बचेंगे यानुसार कार्य करत गेले तरच समाजाचा विकास होणार आहे. पण भाजपाला केवळ जातीय तेढ निर्माण करून सत्ता मिळवायची आहे असेही यावेळी बोलताना आमदार जयंत पाटील म्हणाले.




















