मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संभाव्य तारखा जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला आहे. तालुक्यात एकूण चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणांच्या निवडणुका होणार असून, भोसे, लक्ष्मीदहिवडी, हुलजंती आणि दामाजीनगर या चार जिल्हा परिषद गटांमध्ये लढत रंगणार आहे. यामध्ये सर्वसाधारण आरक्षण असलेला भोसे जिल्हा परिषद गट हा सर्वाधिक चर्चेचा आणि हायव्होल्टेज ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

दिग्गज इच्छुक
भोसे गटात इच्छुकांची संख्या मोठी असल्याने राजकीय वातावरण तापले असून, अनेक दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत आहेत. भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, दामाजीचे संचालक तानाजी काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ, बागडेबाबा दूध संस्थेचे चेअरमन दादासाहेब दोलतडे, दामाजीचे संचालक बसवराज पाटील तसेच काँग्रेसचे प्रदेश सचिव ॲड. रविकिरण कोळेकर यांची नावे चर्चेत असतानाच, मंगळवेढा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर यांच्या नावाने सध्या भोसे गटात विशेष जोर धरला आहे.
अधिकृत दुजोरा नाही, निकटवर्तीयांकडून मात्र सकारात्मक संकेत
प्रदीप खांडेकर यांच्याकडून उमेदवारीबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसला, तरी त्यांच्या निकटवर्तीयांकडून मात्र सकारात्मक संकेत मिळत आहेत. भोसे गटातील विविध गावांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा खुलेपणाने होत असून पंचायत समितीतील अनुभव, प्रशासनाशी असलेली ओळख आणि विकासकामांचा मागोवा या मुद्द्यांमुळे खांडेकर यांची संभाव्य उमेदवारी वजनदार मानली जात आहे.

इच्छुकांच्या भेटीगाठी
दरम्यान, अनेक पक्ष आणि आघाड्यांकडून रणनीती आखण्यास सुरुवात झाली असून इच्छुकांनी भेटीगाठी सुरू केल्या असल्याची सध्या चित्र दिसत आहे. उमेदवार निवड, स्थानिक समीकरणे, जाती-धर्मनिरपेक्ष मतदारसंघ आणि विकासाचा अजेंडा या मुद्द्यांवर जोरदार चर्चा सुरू आहे. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने मित्रपक्षांतील समन्वय, आघाडी-युती आणि बंडखोरीचे संभाव्य धोके यावरही लक्ष ठेवले जात आहे. एकूणच, भोसे जिल्हा परिषद गटात विविध दिग्गजांच्या नावांमुळे लढत चुरशीची होण्याची दाट शक्यता असून, आगामी काळात राजकीय हालचाली अधिक तीव्र होतील, असे संकेत मिळत आहेत. उमेदवारी जाहीर होताच चित्र अधिक स्पष्ट होणार असले तरी, सध्या तरी भोसे गटातील प्रत्येक गावात निवडणुकीची चर्चा शिगेला पोहोचली आहे.























