पंढरपूर/तालुका प्रतिनिधी : चीन मधून येणाऱ्या निकृष्ट बेदाण्याची विक्री राज्यात होत असल्याने शेतकरी धास्तावले असून अशी विक्री करणाऱ्या आडतदार, व्यापारी, दलाल यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करकंब येथील द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी केली.
द्राक्ष व बेदाणा उत्पादन घटण्याची चिंता
महाराष्ट्रात बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष व बेदाणा उत्पादन घटण्याची चिंता लागून राहिली असतानाच अशा कृतीमुळे शेतकरी उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. सांगली, तासगांव, विजयपूर पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात बेदाणा स्टोरेज आहेत. काही व्यापाऱ्यांनी आयात कर माफ असल्याचा गैरफायदा घेऊन चीनचा अंदाजे दोन हजार टन निकृष्ट प्रतीचा बेदाणा अफगाणिस्तानातून मागवला आहे.

चिनी बेदाणा आरोग्यास घातक
बेदाण्याचे १० किलोचे बॉक्स फोडून त्याचे प्रोसेसिंग, वाशिंग व कृत्रीम रंग देऊन तो पुन्हा भारतीय १५ किलोच्या बॉक्समध्ये रीपॅकिंग करून आणण्याचा काही व्यापारी आणि कोल्ड स्टोरेज मालक यांचा डाव आहे. स्थानिक बाजारात त्यांचा भांडाफोड २७ डिसेंबर रोजी संघाच्या पदाधिकाऱ्याने कोल्ड स्टोरेज मध्ये प्रत्यक्ष जाऊन बॉक्स उघडून केला होता. त्यांनी तासगाव बाजार समितीच्या संचालकांना बोलवून ही माहिती सांगितली.























