मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी
गोणेवाडी (ता.मंगळवेढा) हद्दीतील ऊस शेत परिसरात बिबट्यासदृश प्राणी दिसल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास लेंडवे चिंचाळे येथील शेतकरी दादासो राजाराम लेंडवे हे कामानिमित्त शेतात गेले असता, ऊस शेताच्या बांधावरून बिबट्यासदृश प्राणी जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
ग्राम सुरक्षा यंत्रणेमार्फत नागरिकांना सतर्कतेचा इशारा
सुमारे २०० ते ३०० फूट अंतरावरून त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये त्या प्राण्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर ही माहिती त्यांनी तात्काळ लेंडवे चिंचाळे येथील पोलीस पाटील हिम्मतराव पाटील यांना दिली. घटनेची दखल घेत पोलीस पाटील यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेमार्फत परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शेतकरी व मजुरांनी शेतात एकट्याने जाणे टाळावे, लहान मुले व वृद्धांनी विशेष काळजी घ्यावी, तसेच रात्रीच्या वेळी अनावश्यक हालचाल करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच बिबट्यासदृश प्राणी किंवा संशयास्पद हालचाल पुन्हा दिसल्यास घाबरून न जाता सुरक्षित अंतर राखून तात्काळ प्रशासनाला कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेमुळे गोणेवाडी व लेंडवे चिंचाळे परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.























