नंदेश्वर/ प्रतिनिधी : स्व. दादासाहेब गरंडे यांच्या निधनाने मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी कधीही भरून निघणार नाही. ग्रामपंचायत सदस्य पदापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास हा अत्यंत प्रेरणादायी होता. स्वतः दोन वेळा सरपंच, उपसरपंच अशी जबाबदारी समर्थपणे सांभाळतानाच त्यांच्या कुटुंबातील दोन व्यक्ती सरपंच व स्वतः उपसभापती पदावर पोहोचले. तसेच भोसे जिल्हा परिषद गटातून अनेक लोकप्रतिनिधी त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडले. तळागाळातील लोकांना सोबत घेऊन काम करणारा असा नेता तालुक्याच्या दक्षिण भागातच नव्हे तर संपूर्ण मंगळवेढा तालुक्यात पुन्हा होणे नाही असे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले. माजी उपसभापती स्व.दादासाहेब गरंडे यांना श्रद्धांजली वाहत असताना आ.आवताडे बोलत होते.

मंगळवेढा तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती स्व. दादासाहेब गरंडे यांना आमदार समाधान आवताडेंची श्रद्धांजली मंगळवेढा तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा ज्येष्ठ लोकप्रतिनिधी स्व.दादासाहेब गरंडे यांचे दुर्दैवी निधन झाल्याने मंगळवेढा तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात असून, सर्व स्तरांतून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार समाधान आवताडे यांनी नंदेश्वर येथील गरंडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन स्व. दादासाहेब गरंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी गरंडे कुटुंबीयांची भेट घेऊन भाऊसाहेब गरंडे आणि माजी सरपंच बाळासाहेब गरंडे यांचे सांत्वन केले.

आ. आवताडे पुढे म्हणाले की, स्व. दादासाहेब गरंडे यांनी आपल्या कार्यकाळात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. पक्षीय राजकारणापेक्षा लोकहिताला प्राधान्य देणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या कार्यामुळे त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते.

यावेळी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक भागवत गरंडे, दामाजीचे संचालक तानाजी काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर, दादासाहेब दोलतडे, शिवसेना माजी तालुकाप्रमुख अशोक चौंडे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आकाश डांगे, गुरुलिंग दोलतडे, पोलीस पाटील संजय गरंडे, दाजी गरंडे, ज्ञानू गरंडे, तुकाराम गरंडे, जयसिंग कांबळे, दत्ता साबणे यांचेसह परिसरातील विविध राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच स्व. दादासाहेब गरंडे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.























