तीर्थक्षेत्र विकास आघाडी कडून पत्रकार महादेव धोत्रे हे प्रभाग क्रमांक आठ मधून नगरसेवक पदासाठी लढवित आहेत निवडणूक
मंगळवेढा (प्रतिनिधी)
मंगळवेढा तालुक्यातील पत्रकारितेचा भक्कम पाया रचत जनतेचा विश्वास संपादन करणारे साप्ताहिक मंगळवेढा दिशाचे संपादक महादेव धोत्रे आता प्रत्यक्ष राजकारणात उतरले आहेत. दीर्घकाळ पत्रकारितेच्या माध्यमातून शहराच्या विकासाला दिशा देत, सामाजिक प्रश्नांना आवाज देत, प्रशासनापुढे सामान्य नागरिकांच्या समस्या सातत्याने मांडत त्यांनी एक वेगळा ठसा उमटवला आहे. आजवर समाजभान जपत केलेले प्रामाणिक काम, लोकांतील जवळीक आणि समस्यांचा अभ्यास यामुळेच तीर्थक्षेत्र विकास आघाडीने त्यांच्यावर विश्वास ठेवत प्रभाग क्रमांक ८ मधून नगरसेवक पदाची उमेदवारी जाहीर केली आहे.
- पत्रकारितेतून समाजकारण— समाजकारणातून राजकारण
पत्रकारिता ही महादेव धोत्रे यांची पहिली ओळख. त्यांच्या लेखणीने मंगळवेढा शहरातील अनेक प्रश्न प्रकाशझोतात आले. विविध घडामोडींवर निर्भीड भूमिकेतून त्यांनी केलेले काम लोकांच्या मनात नेहमीच राहिले आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी शहराच्या राजकारणाला योग्य दिशा देण्याचे कार्य केले; परंतु समाजातील बदलासाठी केवळ निरीक्षक न राहता प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी लक्षात घेतले. यामुळेच लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

- उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रचाराची रणधुमाळी सुरू होताच महादेव धोत्रे यांना प्रभागातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या पारदर्शक प्रतिमेमुळे, विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे आणि प्रामाणिक कार्यपद्धतीमुळे अनेक नागरिक त्यांच्याबरोबर उभे राहत आहेत. प्रभागातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा यांसारख्या प्राथमिक गरजांवर ठोस काम करण्याची त्यांची भूमिका स्पष्ट आहे. सामाजिक सलोखा, युवकांसाठी संधी निर्माण करणे आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहण्याची त्यांची भूमिका लोकांना भावते आहे. - समाजहिताचा संकल्प
पत्रकार म्हणून लोकांच्या समस्या ऐकल्या, त्यावर सातत्याने लेखणी फिरवली आणि त्या समस्यांचे निराकरण व्हावे म्हणून प्रयत्न केले. आता राजकीय क्षेत्रात प्रवेश करून त्या समस्यांवर प्रत्यक्ष कारवाई करण्याचा संकल्प महादेव धोत्रे यांनी केला आहे. मंगळवेढा शहराचा विकास, पारदर्शक प्रशासन, वंचितांसाठी काम आणि युवकांना योग्य दिशा देण्याच्या उद्दिष्टांसह ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
महादेव धोत्रे यांची उमेदवारी ही पत्रकारितेतील प्रामाणिक भूमिकेवर आधारित, समाजकारणाशी बांधिलकी जपणारी आणि विकासाभिमुख विचारांची आहे. मंगळवेढा शहरातील नागरिक या नव्या बदलाचे स्वागत कसे करतात, हे येणाऱ्या काळात निश्चित होईल.






















