टीम सोलापूर आजतक
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून आमदार समाधान आवताडे यांनी विजय मिळविला आहे. यानंतर भाजपकडून अनेक नेते आता मतदारसंघात आम्हाला विरोधक उरला नाही असे वक्तव्य करीत आहेत. अशा वल्गना करणाऱ्या सर्व वाचाळविरांना सांगा की.. अनिल सावंत अभी जिंदा है… आगामी काळात अनिल सावंत सर्वांना पुरून उरणार आहेत.. तसेच आगामी सर्व निवडणुका आम्ही अनिल सावंत यांचे नेतृत्वाखाली लढू आणि जिंकून देखील दाखवु असे प्रतिपादन संग्राम माने या युवकाने करताच उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि शिट्ट्यांचा गजर केला.
विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे चिंतन करण्यासाठी अनिल सावंत यांनी मंगळवेढा येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांची विचार मंथन बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आपले मनोगत व्यक्त करताना संग्राम माने या युवकाने उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते राहुल शहा, माजी नगरसेवक चंद्रशेखर कोंडूभैरी, कार्याध्यक्ष संतोष रंधवे, प्रथमेश पाटील, काँग्रेस नेते फिरोज मुलाणी, दादासाहेब गरंडे, धनाजी गडदे, बबन ढावरे यांच्यासह ग्रामीण भागातील विविध गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदीजन उपस्थित होते.






















