मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी
श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ यासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराच्या घोषणेने प्राचार्य विठ्ठल एकमल्ली यांचे कडून व तसेच शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

गेल्या दहा वर्षापासून सतत प्रवीण तुकाराम डांगे यांनी आपल्या अध्यापन कार्यातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्यामध्ये संस्कार, शिस्त, सामाजिक जाणीव आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याची त्यांची कार्यपद्धती राहिली आहे. शाळेतील विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या समर्पित सेवाभावाची आणि उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १.३० वाजता पंढरपूर येथील स्वेरी कॉलेज पंढरपूर येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती स्वेरी कॉलेजचे प्राचार्य रोंगे यांनी दिली आहे.























