नंदेश्वर / प्रतिनिधी : समाजातील अनाथ, निराधार तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार घडविण्याच्या उद्देशाने नंदेश्वर येथे ‘श्री कृपासिंधू बाल अनाथ आश्रम’ उभारण्यात येत आहे. समाजातीलच दानशूर व्यक्ती, ग्रामस्थ व विविध स्तरातील नागरिकांच्या सहकार्याने आश्रमाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून हे काम सध्या प्रगतिपथावर आहे.

दरम्यान, नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर आश्रमाच्या बांधकामाच्या चौकटीचे पूजन गावातील माता-माऊल्यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौकट पूजनाच्या निमित्ताने आश्रमाच्या उभारणीच्या कार्याला अधिक बळ मिळाले असून ग्रामस्थांमध्येही या सामाजिक उपक्रमाबद्दल उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विविध स्तरातील मान्यवरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
अनाथ व गरजू मुलांच्या भवितव्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला समाजातील अनेक व्यक्तींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आश्रमाच्या बांधकामासाठी विविध स्तरांतून आर्थिक तसेच वस्तुरूपाने मदत मिळत असून, समाजातील नागरिकांना उत्तम स्वयंस्फूर्तीने या कार्यात सहभागी होत आहेत. त्यामुळे ‘एक हात मदतीचा, एका मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ या भावनेतून आश्रमाच्या उभारणीचे काम पुढे जात आहे.
शालेय शिक्षणासोबतच वारकरी शिक्षण पूर्णपणे मोफत देण्याचा मानस – ह.भ.प.रोहन मेटकरी महाराज
या आश्रमाच्या माध्यमातून केवळ निवारा देणे हा उद्देश नसून, अनाथ व गरजू मुलांना शिक्षण, संस्कार, वारकरी परंपरा आणि आत्मविश्वास देऊन त्यांचे आयुष्य घडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ग्रामीण भागातील गरजू मुलांसाठी हा आश्रम भविष्यात आधारवड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या सामाजिक उपक्रमाची माहिती संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. रोहन (पंढरी) महाराज मेटकरी यांनी दिली. समाजातील नागरिकांनी या उपक्रमाला सढळ हाताने सहकार्य करून आश्रमाच्या उभारणीत आपला खारीचा वाटा उचलावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. नंदेश्वर येथे उभा राहत असलेला हा आश्रम भविष्यात अनेक अनाथ व गरजू मुलांच्या जीवनाला नवी दिशा देणारा ठरणार असून, समाजाच्या सहकार्याने सुरू असलेल्या या सेवाकार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.























