मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी
गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने वैद्यकीय सेवा देत समाजातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवेचा आधार देणारे नंदेश्वरचे सुपुत्र डॉ.भारत गरंडे यांना त्यांच्या उल्लेखनीय वैद्यकीय कार्याबद्दल शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य २०२६ प्रदान करण्यात आला. वाघ्या-मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य आणि मल्हारगड देवस्थान, भोर यांच्या संयुक्त विद्यमाने हा सन्मान करण्यात आला.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष व मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, मल्हारगड देवस्थान, भोरचे महंत मार्तंड साठे सर, जेजुरी देवस्थानचे अध्यक्ष ससाणे साहेब तसेच तुकाराम महाराज यांचे वंशज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. भारत गरंडे यांनी गेल्या दोन दशकांमध्ये वैद्यकीय क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि समर्पित सेवा बजावली आहे. ग्रामीण व सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी त्यांनी अनेक वर्षे कार्य केले. त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेत त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. गंभीर परिस्थितीत प्रसंगावधान राखून केलेली वैद्यकीय मदत आणि उपचार यामुळे डॉ. गरंडे यांच्या सेवाभावी कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले. वैद्यकीय ज्ञानासोबतच रुग्णांप्रती असलेली संवेदनशीलता आणि सेवाभाव यांचे दर्शन त्यांच्या कार्यातून घडते, असे उपस्थित मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.

वीस वर्षांच्या वैद्यकीय सेवेची योग्य दखल
या सन्मानामुळे डॉ.भारत गरंडे यांच्या २० वर्षांच्या वैद्यकीय सेवेला योग्य ती दखल मिळाली असून, त्यांच्या कार्याचा गौरव झाला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध सामाजिक, धार्मिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांसह वाघ्या-मुरळी समाजातील नागरिकांनी डॉ. भारत गरंडे यांचे अभिनंदन केले. वैद्यकीय सेवा ही केवळ व्यवसाय नसून मानवसेवेचे माध्यम आहे, या भावनेतून कार्य करणाऱ्या डॉ.भारत गरंडे यांचा हा सन्मान समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

तीव्र हृदयविकाराच्या झटक्यात दिले जीवदान
या पुरस्कारामागील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे वाघ्या-मुरळी परिषदचे कार्याध्यक्ष शाहीर सुभाष गोरे (जवळा, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांना सोलापूर येथील एका कार्यक्रमादरम्यान अचानक आलेल्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्यात डॉ. भारत गरंडे यांनी तत्परतेने वैद्यकीय उपचार व मदत उपलब्ध करून दिली. इतकेच नाही तर डॉक्टर गरंडे यांनी अश्विनी हॉस्पिटल सोलापूर प्रशासनाला विनंती करून शाहीर सुभाष गोरे यांचे तब्बल दोन लाख रुपये बिल माफ केले. तसेच डॉक्टर गरंडे यांच्या तातडीच्या उपचारामुळे सुभाष गोरे यांना वेळीच जीवदान मिळाले आणि ते सुखरूप बचावले. सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये डॉ.भारत गरंडे हे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. डॉ.भारत गरंडे यांनी आजपर्यंत अनेकांना मदत केली आहे.
























