सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क..
मंगळवेढा तालुक्यात नुकत्याच पार समविचारी आघाडीची बैठक, प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती ठरली केंद्रबिंदू, मंगळवेढा तालुक्यात चर्चेचा विषय..पडलेल्या समविचारी आघाडीच्या बैठकीत विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे आणि काँग्रेसचे मंगळवेढा शहराध्यक्ष अॅड. राहुल घुले यांच्या अनुपस्थितीमुळे तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

प्रमुख विरोधी नेत्यांची अनुपस्थिती, तालुक्यात चर्चा..
सत्ताधारी भाजपविरोधात तालुक्यातील प्रमुख विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नेत्यांची अनुपस्थिती अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. अनिल सावंत यांनी मंगळवेढा तालुक्यासह पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात विरोधी पक्ष चांगल्या पद्धतीने जिवंत ठेवला आहे. तर प्रशांत साळे यांनी काँग्रेसचा पाया मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागात टिकवून ठेवला आहे. शहरात विविध आंदोलनांच्या माध्यमातून मंगळवेढा नगरपालिकेला लक्ष्य करणारे अॅड. राहुल घुले हेही सातत्याने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आघाडीवर राहिले आहेत. त्यामुळे या तिन्ही नेत्यांच्या अनुपस्थितीमागचे कारण काय, याबाबत राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू आहे.

भालके समर्थकांचा बैठकीतून काढता पाय..
बैठकीदरम्यान आणखी एक नाट्यमय घडामोड घडली. काँग्रेसचे नेते भगिरथ भालके यांना या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आले नाही, यावरून त्यांच्या समर्थकांनी बैठकीतून निषेध म्हणून बाहेर पडत काढता पाय घेतला. या घटनेमुळे आघाडीतील मतभेद अधिकच प्रकर्षाने पुढे आले.

समन्वयाचा अभाव..
सध्या मंगळवेढा तालुक्यातील राजकारणात समविचारी आघाडीचे एकत्रीकरण सोपे नाही, अशी परिस्थिती दिसून येत आहे. विरोधी पक्षातील विविध गटांमध्ये संवाद व समन्वयाचा अभाव स्पष्टपणे जाणवत आहे. स्थानिक मतदारांमध्ये “जोपर्यंत सर्व विरोधक एकत्र येणार नाहीत, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपच्या विरोधात जिंकणे कठीण आहे,” अशा चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
एकंदरितच, मंगळवेढा तालुक्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आणि तिच्या पार्श्वभूमीवरील घडामोडी विरोधकांच्या एकतेसमोरील आव्हाने आणि अंतर्गत मतभेद अधोरेखित करत आहेत.























