नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून विविध राजकीय गट व नेतेमंडळींनी आपापल्या पातळीवर पूर्वतयारी सुरू केली आहे. बैठका, गाठीभेटी आणि मतदारांशी संवाद याला वेग आला असून निवडणुकीच्या रणनीती आखण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, केवळ राजकीय समीकरणे आणि प्रचारयंत्रणांवर भर न देता गावाच्या विकासाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवरही चर्चा होणे तितकेच आवश्यक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. विशेषतः अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले काही मूलभूत प्रश्न अद्यापही मार्गी लागले नसल्याने यंदाच्या निवडणुकीत हे मुद्दे केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.

नंदेश्वर आणि चाळीस गावांसाठी मंजूर असलेले पोलीस स्टेशन वर्षानुवर्षे प्रलंबित
नंदेश्वर गावासह जवळपास 40 गावांसाठी मंजूर झालेले पोलीस स्टेशन हे त्यापैकी एक महत्त्वाचे प्रकरण आहे. नंदेश्वर सहित चाळीसगावांसाठी मंजूर असलेले हे पोलीस स्टेशन अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी पाठपुरावा करणे अगदी मंत्रालयापर्यंत हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सदर पोलीस स्टेशन गावात झाल्यास गावाची बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीने चालेल. अनेकांना रोजगार मिळेल. त्यामुळे यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे असं मतप्रवाह व्यक्त होतोय.

प्राथमिक आरोग्य केंद्रासाठीचा पाठपुरावा रखडला
तसेच, नंदेश्वर सह आठ गावांसाठी मंजूर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उभारणीबाबतही अद्याप ठोस हालचाल झालेली नाही. आरोग्याच्या मूलभूत सुविधा मिळण्यात अडचणी येत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी दूरवर जावे लागत आहे. त्यामुळे या प्रश्नाचा पाठपुरावा कोण करणार, हा प्रश्न ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

आगामी निवडणुकीत मतदारांचा कल केवळ राजकीय आश्वासनांकडे न राहता गावातील प्रलंबित विकासकामे कोण पूर्णत्वास नेईल, याकडे राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक ही केवळ सत्तेची लढाई न ठरता विकासाच्या मुद्यांवर आधारित होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. गावातील नागरिकांमध्ये हे मुद्दे अधिक तीव्रतेने चर्चेत येण्याची शक्यता आहे. तसेच या मुख्य मुद्द्यांसहिता अनेक विषयांवर गावाच्या विकासाला चालना देता येईल. या प्रश्नांना आगामी इच्छुक उमेदवार किती न्याय देऊ शकतात यावरही निवडणुकीचे गणित अवलंबून असेल असेही नागरिक बोलताना दिसत आहे.
























