टीम सोलापूर आजतक
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघामधून भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तुतारी ए.बी. फॉर्म देण्यात आला आहे. यामुळे अनिल सावंत हे तुतारी फुंकणार असल्याने मतदार संघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण तयार झाले आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवारी नक्की कोणाला मिळणार याविषयी उत्कंठा शिगेला पोहोचली होती. काँग्रेस पक्षाच्या वतीने विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांना काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवारी भगीरथ भालके यांना निश्चित मानली जात असताना भगीरथ भालके यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खा. शरद पवार यांनी तुतारी कडून इच्छुक असलेले अनिल सावंत यांना तात्काळ बोलावून घेऊन तुतारी कडून अर्ज भरण्यास सांगितले. अनिल सावंत यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून अर्ज दाखल केला. आज मंगळवार दि. 29 रोजी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे हस्ते अनिल सावंत यांना राष्ट्रवादी पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पंढरपूर तालुकाध्यक्ष संदीप मांडवे, विधानसभा मतदारसंघ कार्याध्यक्ष रंधवे, श्याम गोगाव, कृष्णदेत लोंढे हे उपस्थित होते. अनिल सावंत यांना राष्ट्रवादी पक्षाचा एबी फॉर्म मिळाल्यामुळे मतदार संघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष केला जात आहे.
