लवंगी/ विशेष प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील राजकीय घडामोडींना आज महत्त्वाचा कलाटणी मिळाली असून भैरवनाथ शुगरचे चेअरमन तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे नेते अनिल सावंत यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. लवंगी येथील भैरवनाथ शुगर कारखान्याच्या परिसरात झालेल्या विचारविनिमय बैठकीत सावंत यांनी हा निर्णय जाहीर केल्याने भोसे जिल्हा परिषद गटासह संपूर्ण मंगळवेढा तालुक्यातील चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील चारही गटात सावंत यांचा तीर्थक्षेत्र विकास आघाडीला पाठिंबा
भोसे जिल्हा परिषद गटात तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार बसवराज पाटील, रड्डे पंचायत समिती गणाचे उमेदवार सुरेश कांबळे तसेच भोसे पंचायत समिती गणाचे उमेदवार प्रवीण ज्ञानेश्वर मेटकरी यांना अनिल सावंत यांनी पाठिंबा जाहीर केला. यासोबतच मंगळवेढा तालुक्यातील चारही जिल्हा परिषद गटांमधील तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला.
सच्च्या कार्यकर्त्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीला पाठिंबा
या निर्णयामागे अनिल सावंत यांचे सच्चे कार्यकर्ते तसेच तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे रड्डे पंचायत समिती गणाचे उमेदवार सुरेश कांबळे यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे बोलले जात आहे. गत विधानसभा निवडणुकीत सुरेश कांबळे यांनी अनिल सावंत यांच्यासाठी निस्वार्थी मदत केली होती. भाजपविरोधी मतांमध्ये फूट पडू नये, तसेच प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहण्यासाठी अनिल सावंत यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
कार्यकर्ता म्हणूनच विचार विनिमय बैठकीसाठी उपस्थित – सुरेश कांबळे
विचारविनिमय बैठकीदरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. काही कार्यकर्त्यांनी भाजपला पाठिंबा द्यावा अशी मागणीही केली होती. मात्र सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर सावंत यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या बाजूने ठाम भूमिका घेतली. यावेळी रड्डे पंचायत समिती गणाचे उमेदवार सुरेश कांबळे यांनीही आपल्या मनोगतात भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत, मी शेवटपर्यंत अनिल सावंत यांचा कार्यकर्ता म्हणूनच राहणार आहे. आज या बैठकीत मी उमेदवार म्हणून नव्हे, तर सावंत साहेबांचा कार्यकर्ता म्हणून उपस्थित आहे असे स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.
विचारविनिमय बैठकीला समर्थकांची मोठी गर्दी
या विचारविनिमय बैठकीसाठी अनिल सावंत यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. बैठकीला विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके, भोसे जिल्हा परिषद गटाचे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार बसवराज पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, राष्ट्रवादीचे प्रथमेश पाटील, मनसेचे नारायण गोवे, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख तुकाराम भोजने, आप्पासाहेब माने, खडकी मठाचे मठाधिपती सुदर्शन महाराज यांच्यासह मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांमधून आलेले राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनिल सावंत यांच्या या भूमिकेमुळे मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या राजकारणात महत्त्वपूर्ण बदल घडण्याची शक्यता असून, तीर्थक्षेत्र विकास आघाडीला याचा निश्चितच फायदा होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.























