सोलापूर (प्रतिनिधी)
लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.२४ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत संस्थेच्या भोसरी येथील कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शेलार यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. संस्थेचे जेष्ठ कार्यकर्ते विलास लोहार यांचे हस्ते प्रभू विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन करून सामुहिक आरतीने सभेची सुरुवात झाली. सभेत खालील प्रमाणे कामकाज झाले. संस्थेचे सचिव प्रा.डॉ. रामदास लाड यांनी प्रास्ताविक केले व गेल्या वर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचन केले.

तसेच वार्षिक कार्यअहवालाचे वाचन केले. संस्थेचे खजिनदार महेश हरिहर यांनी लेखापरीक्षण अहवाल सादर केला व वार्षिक आर्थिक अहवालाचे वाचन केले. तसेच आगामी वर्षासाठीचे बजेट सादर केले. प्रा.रामदास लाड यांनी लोहार उत्सव समिती, भक्ती शक्ती महिला मंडळ, उद्योग समिती, विश्वकर्मा एंटरटेनमेंट व ऐतिहासिक सहल समिती या समितींच्या पुढील तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणींचे ठराव मांडले व त्याला उपस्थित सदस्यांनी मंजुरी दिली. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी लेखा परिक्षणाची जबाबदारी मे.नितीन फुंदे ॲन्ड कंपनी यांना द्यावी असा ठराव मांडला व उपस्थित सदस्यांनी मंजुरी दिली.

लोहार उत्सव समिती, भक्ती शक्ती महिला मंडळ, उद्योग समिती, विश्वकर्मा एंटरटेनमेंट, ऐतिहासिक सहल या समितींच्या नवनिर्वाचित अध्यक्षांना सदस्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब शेलार यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना लोहार उत्सव समिती अध्यक्ष श्री दत्ता लोहार, उद्योग समिती अध्यक्ष श्री महेश, भक्ती शक्ती महिला मंडळ अध्यक्षा सौ भारती शेलार, ऐतिहासिक सहल समिती अध्यक्ष औदुंबर कळसाईत यांचे हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शेलार यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व सर्व पदाधिकारी यांना संस्थेच्या प्रगतीसाठी व समाजाच्या भल्यासाठी काम करण्यासाठी पदाधिकारी यांनी आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडण्यासाठी आवाहन केले. अल्पोपहाराने सभेची सांगता झाली.




















