नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील हून्नूर येथे मतदारसंघाचे आ. समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद सोलापूर व पंचायत समिती मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६–२७ अंतर्गत ‘चारा उत्पादन’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२६–२७ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या चारा उत्पादन योजनेच्या माध्यमातून पशुपालकांना प्रातिनिधिक स्वरूपात सुधारित वैरण बियाण्यांचे वाटप करण्यात आले. पशुधनासाठी वर्षभर सकस हिरवा चारा उपलब्ध व्हावा आणि चाऱ्याची कमतरता भासू नये, हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमात पंचायत समिती सदस्य आप्पासाहेब निकम यांनी मार्गदर्शन करताना पशुपालकांनी उपलब्ध जमिनीवर मोठ्या प्रमाणात हिरव्या चाऱ्याची लागवड करावी, चारा साठवणुकीवर विशेष भर द्यावा तसेच आधुनिक पद्धतीने मुरघास (सायलेज) निर्मितीचा अवलंब करून पशुधनासाठी दर्जेदार खाद्याची उपलब्धता कायम ठेवावी, असे आवाहन केले.
ते पुढे म्हणाले की, शेतकरी व पशुपालकांना सकस हिरवा चारा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या या योजनेअंतर्गत १०० टक्के अनुदानावर सुधारित वैरण बियाण्यांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पशुपालकांनी आपल्या नजीकच्या शासकीय पशुवैद्यकीय संस्थेमध्ये वैरण बियाणे मागणी अर्ज तातडीने सादर करावेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले.
या कार्यक्रमास गावचे सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पंचायत समितीचे प्रतिनिधी, पशुपालक, शेतकरी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी शासनाच्या या उपयुक्त योजनेचे स्वागत करत पशुपालन व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी अशा योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्याची अपेक्षा व्यक्त केली.























