मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भागवत शंकर कसबे (वय ७५) यांचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी, दि. १७ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे नंदेश्वर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

गेल्या आठ दिवसांपासून होते बेपत्ता…
भागवत कसबे हे शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी रात्री सात वाजल्यापासून बेपत्ता होते. त्यांची स्मरणशक्ती कमी झाल्यामुळे त्यांना आपण कुठे जात आहोत, याचे भान राहत नव्हते. यापूर्वीही ते एकदा बेपत्ता झाले होते; मात्र त्यावेळी कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला होता. यावेळी कसबे कुटुंबीयांनी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह आसपासच्या परिसरात आणि कर्नाटकातही त्यांचा शोध घेतला. मात्र, आठ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतरही त्यांचा ठावठिकाणा लागला नव्हता.
विहिरीत पडून मृत्यू.. मृतदेह पाहताच कुटुंबियांचा आक्रोश
दरम्यान, नंदेश्वर येथील सौदागर यांच्या कोरड्या विहिरीजवळ शनिवारी, दि. १७ ऑक्टोबर रोजी अमोल सौदागर गेले असता त्यांना विहिरीत भागवत कसबे यांचा मृतदेह आढळून आला. कसबे हे बेपत्ता असल्याची माहिती ग्रामस्थांना असल्याने त्यांनी तातडीने त्यांच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
बेपत्ता झालेल्या दिवशीच विहिरीत पडलेले असावेत असा अंदाज
कसबे हे बेपत्ता झाल्याच्या दिवशीच विहिरीत पडले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावातून हळहळ व्यक्त होत आहे.























