नंदेश्वर / विशेष प्रतिनिधी
नंदेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहशिक्षक अशोक विठ्ठल मासाळ यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल सूर्योदय फाउंडेशन, सांगोला यांच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘शिक्षक गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. या निवडीमुळे नंदेश्वरच्या शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षक अशोक मासाळ यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांची निष्ठा यांची दखल घेत सूर्योदय फाउंडेशनने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.

शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता सांगोला येथील नगर परिषदेसमोरील अहिल्यादेवी होळकर सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. सूर्योदय फाउंडेशनचे अध्यक्ष अनिलभाऊ इंगवले व सचिव जगन्नाथ भगत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

या निवडीबद्दल शिक्षक अशोक मासाळ यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.























