सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क..
नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेला गोणेवाडी (ता. मंगळवेढा) येथील अजित हजारे यांनी अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा प्रिंटर भेट दिला. त्यांच्या या दातृत्वाचे शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद तसेच नंदेश्वर ग्रामस्थांनी मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब सासणे, माजी अध्यक्ष गुरुलिंग दोलतडे, उपाध्यक्ष पोपट बंडगर, मुख्याध्यापक प्रदीप पाटील यांचेसह सहशिक्षक अशोक मासाळ, बाळासाहेब मासाळ, दादासाहेब इंगोले, पोपट हजारे, सचिन लाळे, गवळी हे उपस्थित होते.
अजित हजारे यांचे दातृत्व कौतुकास पात्र – गुरुलिंग दोलतडे
या कार्यक्रमावेळी बोलताना शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष गुरुलिंग दोलतडे म्हणाले की, अजित हजारे हे नंदेश्वर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेचे सहशिक्षक रघुनाथ हजारे यांचे सुपुत्र आहेत. एका शिक्षकाची शिक्षणाविषयीची तळमळ त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचल्याचे हे दातृत्व दाखवते. नंदेश्वर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या इतिहासात सर्वात मोठी मदत २८०००/ रुपये किमतीचा प्रिंटर दिला यामुळे अजित हजारे हे कौतुकास पात्र तर आहेतच याशिवाय त्यांचे आभार मानावे तितके थोडे असल्याचेही यावेळी बोलताना दोलतडे म्हणाले.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा सक्षम, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास समर्थ – अजित हजारे
या प्रसंगी अजित हजारे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेतच शिक्षण देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा सक्षम, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास समर्थ आहेत. शाळेच्या विकासासाठी आणि डिजिटल शिक्षणाच्या दिशेने हा प्रिंटर उपयुक्त ठरणार असल्याची भावना शिक्षक व ग्रामस्थांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी अजित हजारे यांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक मासाळ यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन बाळासाहेब मासाळे यांनी केले.























